समृद्धी महामार्गावर दरोडा टाकणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई



अहिल्यानगर - समृद्धी महामार्गावर वाहने अडवून चालकांना मारहाण करत लुटमार करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ४ दिवसांत पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ६ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून ९ लाख २८ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

नेमकी घटना काय?

दिनांक २७ मे २०२६ रोजी समृद्धी महामार्गावर पोल क्र. ५२९.९ येथे ७ ते ८ जणांच्या टोळीने ट्रकमधून डिझेल घेऊन जाणाऱ्या दत्ता राजुळे (रा. लांबोटा, ता. निलंगा, जि. लातूर) याला लोखंडी रॉडने मारहाण केली. आरोपींनी त्यांच्याकडून डिझेल आणि रोख रक्कम असा एकूण ७,४६५ रुपयांचा ऐवज लुटला. याच टोळीने एका वॅगनार कारचालकाला आणि त्याच्या पत्नीला दमदाटी करून १ लाख २४ हजार रुपयांचे दागिने व रोख रक्कम लुटली. एवढेच नव्हे तर, ट्रक क्र. बी.आर. ०३ जी.बी. ४८८३ यावरील चालकाला मारहाण करून १५० लिटर डिझेल व ४,१०० रुपये रोख असा १८,९५० रुपयांचा माल बळजबरीने चोरून नेला. अशा प्रकारे एकूण १,५०,४१५ रुपयांचा ऐवज दरोडा टाकून चोरला होता. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांची विशेष मोहीम

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. तांत्रिक माहिती आणि व्यावसायिक कौशल्याच्या आधारे पोलिसांनी १ जून रोजी अंबड (जि. जालना) येथून निखिल बद्रीनारायण गोरे (१९) आणि एका विधीसंघर्षीत बालकास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी २ जून रोजी कोकमठाण (ता. कोपरगाव) येथून उर्वरित चार आरोपींना अटक केली त्यामध्ये शिवनाथ शांताराम आव्हाड (२४, रा. शिर्डी), ओम बालाजी खरात (१९, रा. जालना/संभाजीनगर), राहुल साधाकिसन कोकाटे (२३, रा. संभाजीनगर/जालना), साईराज गणेश शहाणे (२१, रा. साकुरी) यांचा समावेश आहे.

९.२८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून गुन्हा करण्यासाठी वापरलेली व्हेरना व स्विफ्ट कार, ६ मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ९ लाख २८ हजार ६०० रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. या टोळीने गुन्ह्यावेळी आणखी तीन साथीदारांची मदत घेतल्याची कबुली दिली असून, पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार विजय पवार, फुरकान शेख, भिमराज खर्से, राहुल डोके, सतिष भवर, रोहित येमुल, सुनिल मालणकर, प्रशांत राठोड, प्रमोद जाधव, महादेव भांड यांचे पथकाने केली आहे. 


 

0/Post a Comment/Comments