सोन्या - चांदीच्या दरात झाली मोठी उलथापालथ, 'असे' आहेत आजचे भाव


मुंबई - सोन्याच्या दरात आज म्हणजेच 30 जून रोजी घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,039 रुपयांनी घसरून 1.40 लाख रुपयांवर आला आहे. यापूर्वी तो 1.41 लाख रुपयांवर होता. तर, 1 किलो चांदीचा दर आज 3,690 रुपयांनी वाढून 2.24 लाख रुपयांवर पोहोचला आहे. यापूर्वी तो 2.20 लाख रुपयांवर होता.

यावर्षी सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार दिसून येत आहे. 2026 मध्ये आतापर्यंत सोने 7 हजार रुपयांनी महागले आहे. 31 डिसेंबर 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचा दर 1.33 लाख रुपयांवर होता, जो आता 1.40 लाख रुपयांवर आहे. तर, 31 डिसेंबर 2025 रोजी चांदी 2.30 लाख रुपये प्रति किलो होती, जी आता 2.24 लाख रुपयांवर आहे. म्हणजेच तिची किंमत 6 हजार रुपयांनी कमी झाली आहे. या काळात 29 जानेवारी रोजी सोन्याने 1.76 लाख रुपये आणि चांदीने 3.86 लाख रुपयांचा सर्वकालीन उच्चांकही गाठला होता.

सोने आणि चांदीच्या दरांमधील अलीकडच्या घसरणीमुळे एकीकडे खरेदी करणारे आनंदी झाले तर, गुंतवणूकदारांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. गुंतवणूकदारांचे लक्ष आता मध्य-पूर्वेतील भू-राजकीय तणावावरून हटून महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिकेच्या फेड रिझर्व्हकडून व्याजदरात आणखी वाढ केली जाण्याच्या शक्यतेकडे वळले, ज्याचा परिणाम मौल्यवान धातूंवर दिसून येत आहे. 

सोने आणि चांदीच्या किमतीवर अख्ख्या जून महिन्यात प्रचंड दबाव दिसून आला. एकीकडे सोन्याच्या दरांमध्ये स्वस्ताईचा नवीन धमाका झाला तर, चांदीची किंमत आता उच्चांकावरून निम्म्याने घसरली आहे. अशा स्थितीत, गुंतवणूकदारांच्या मनात धडधड सुरू असून खरेदीदार मात्र सुखावल्याचं पाहायाला मिळत आहे.

 


0/Post a Comment/Comments