श्रीगोंदा (प्रतिनिधी) - श्रीगोंदा शहरालगत डी.वाय. १२ शेजारील औटेवाडी तलाव परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून वावरत शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणारा बिबट्या अखेर वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला. मंगळवारी (दि. २ जून) पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास हा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही बाब स्थानिकांच्या निदर्शनास आली.
औटेवाडी परिसरातील नगरसेविका अनिताताई औटी, हरिभाऊ औटी आणि अशोक औटी यांच्या निदर्शनास बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची घटना आली. त्यानंतर नगरसेविका अनिताताई औटी यांनी तातडीने वन विभागाशी संपर्क साधून माहिती दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली भगत यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. पहाटे साडेपाचच्या सुमारास वन विभागाच्या पथकाने बिबट्याला ताब्यात घेतले. यावेळी वनरक्षक नितीन डफडे, वनमजूर भाऊसाहेब जमदाडे व भारत लोखंडे उपस्थित होते.
स्थानिक शेतकऱ्यांच्या माहितीनुसार, हा बिबट्या गेल्या सहा महिन्यांपासून परिसरात नियमितपणे वावरत होता. शेतात ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्याचे वारंवार दर्शन होत होते. सुमारे पंधरा ते वीस दिवसांपूर्वी त्याने भरदुपारी एका शेतकऱ्याच्या दोन शेळ्यांवर हल्ला करून त्यांना ठार केले होते. याशिवाय मागील महिनाभरात परिसरात जवळपास आठ शेळ्यांचा फडशा पाडण्यात आल्याच्या घटना घडल्या असून, त्याबाबत वन विभागाकडे नोंदी करण्यात आल्या होत्या.वन विभागाने उभारलेल्या पिंजऱ्यात भक्ष न ठेवल्यामुळे बिबट्या त्याकडे फिरकत नसल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी व शेतमजूर भीतीच्या छायेखाली शेतीची कामे करत होते. या पार्श्वभूमीवर सुमारे महिनाभरापूर्वी तलाव परिसरात पिंजरा लावण्यात आला होता.
दरम्यान, हरिभाऊ औटी यांच्यासह काही शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चातून पिंजऱ्यात शेळी ठेवली. “सरकारी पिंजरा होता, पण आमिष गावकऱ्यांनी दिलं,” अशी चर्चा परिसरात रंगली आहे. या आमिषामुळेच बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. यामध्ये सतीश लक्ष्मण औटी, अशोक औटी, दीपक दिलीप औटी, निखिल औटी, आरीफभाई मालजफ्ते आणि बाळू औटी यांचा सहभाग होता.बिबट्या पकडला गेल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असले तरी या भागात अद्याप बिबट्याची मादी व दोन पिल्लांचा वावर असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. त्यामुळे आणखी एक पिंजरा तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे.
कुदळे मळ्यातही बिबट्याचा हल्ला; दोन शेळ्या ठार
दरम्यान, सोमवारी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास कुदळे मळा परिसरातही बिबट्याचा हल्ला झाला. एक महिला शेळ्या घेऊन शेतातून घरी परतत असताना लिंबोणी बागेजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने दोन शेळ्यांवर झडप घालत त्यांना जागीच ठार केले. महिलेने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. त्यानंतर बिबट्या तलावाच्या दिशेने पसार झाला.या घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक दादासाहेब औटी यांनी वन विभागाशी संपर्क साधला. वनरक्षक नितीन डफडे व भारत लोखंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
"भक्ष ठेवल्यानंतरच बिबट्या पिंजऱ्यात अडकला" - दीपाली भगत
या संदर्भात वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली भगत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, तलाव परिसरात वन विभागाकडून पिंजरा लावण्यात आला होता. स्थानिकांनी भक्ष म्हणून शेळी ठेवल्यानंतरच बिबट्या पिंजऱ्यात अडकला. त्यानंतर वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि बिबट्याला ताब्यात घेण्यात आले.
परिसरात बिबट्याची मादी व दोन पिल्लांचा वावर असल्याची माहिती मिळाली असून, अतिरिक्त पिंजऱ्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या पिंजऱ्यांची उपलब्धता मर्यादित असली तरी शक्य तितक्या लवकर आणखी एक पिंजरा उपलब्ध करून दिला जाईल. तोपर्यंत नागरिकांनी व शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी विशेष सावधगिरी बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले.

Post a Comment