अहिल्यानगर -देशभरातील नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करून मिळवलेली तब्बल ४० लाख ६८ हजार ५५९ रुपयांची रक्कम अहिल्यानगर जिल्ह्यातील बँक खात्यांमधून काढून अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अहिल्यानगरच्या सायबर पोलीस ठाण्यात विविध ११ बँक खातेदार, चेक आणि एटीएमद्वारे पैसे काढणारे अज्ञात इसम व त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १८ ऑगस्ट २०२५ ते ७ एप्रिल २०२६ या कालावधीत देशभरात झालेल्या विविध सायबर फसवणुकीतील रक्कम अहिल्यानगर जिल्ह्यातील काही बँक खात्यांमध्ये वर्ग झाली होती. सायबर गुन्हेगारांशी संगनमत करून या खात्यांचे संचालक, खाते हाताळणारे आणि त्यांच्या साथीदारांनी चेक व एटीएम विड्रॉलद्वारे ही सर्व रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी तातडीने काढून घेतली.
तपासात आरोपींनी कट रचून ही फसवणुकीची रक्कम स्वतःच्या बँक खात्यात वळवून घेत नागरिकांची मोठी फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत सायबर पोलीस ठाण्यातील पो.कॉ. अमोल आव्हाड यांनी सरकार तर्फे फिर्याद दिली आहे. या फिर्यादी वरून सायबर पोलिसांनी विविध ११ जणांच्या विरुद्ध बीएनएस कलम ३१८(४), ३१९(२) सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(सी), (डी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या आंतरराज्यीय वाटणाऱ्या सायबर गुन्ह्याचा पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले करत आहेत.

Post a Comment