नगर - सोलापूर महामार्गावर रुईछत्तीसी गावाजवळ दिंडीतील वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू


नगर तालुका (प्रतिनिधी) - आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर कडे पायी दिंडीत चाललेल्या राहुरी तालुक्यातील एका वृद्ध वारकऱ्याचा हृद्यविकाराने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नगर सोलापूर महामार्गावर रुईछत्तीसी गावाजवळ १६ जुलै रोजी दुपारी घडली आहे. बबन परसराम कोठुळे (वय ८५, रा. मल्हारवाडी, ता. राहुरी) असे मृत वारकऱ्याचे नाव आहे.

मयत बबन कोठुळे हे राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथील महिपती महाराज यांच्या पायी दिंडीत सहभागी होत, पंढरपूर कडे जात होते. सदर दिंडी १६ जुलै रोजी दुपारी नगर - सोलापूर महामार्गाने रुईछत्तीसी गावाजवळ गेली असता, पायी चालताना बबन कोठुळे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे दिंडीतील काही वारकऱ्यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविले.

त्यांचा मुलगा गोरखनाथ कोठुळे यांनाही याबाबत कळविण्यात आले. तेही तातडीने जिल्हा रुग्णालयात आले. जिल्हा रुग्णालयातील मेडिकल ऑफिसर डॉ. चोपडे यांनी बबन कोठुळे यांची तपासणी केली असता उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. याबाबतच्या अहवालावरून नगर तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मयत बबन कोठुळे यांच्यावर सायंकाळी उशिरा त्यांच्या गावी मल्हारवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुले, १ मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.


0/Post a Comment/Comments