राहुरी - नगर-मनमाड रोडवरील कोल्हार खुर्द शिवारात हॉटेल साई प्रसाद समोर एसटी बस आणि मारुती सुझुकी कंपनीच्या अर्टिगा कारचा समोरासमोर भीषण अपघात झाला असून, यामध्ये कारमधील ७० वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. कादीर फकीरमहमद शेख (वय ७०, रा. हसनापूर, ता. राहता) असे मृत वृद्धाचे नाव आहे.
ही दुर्घटना ७ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडली. कारमधील प्रवासी कोल्हार खुर्द येथे एका अंत्यविधीसाठी जात असताना, समोरून रॉग साईडने येणाऱ्या एसटी बसच्या (क्र. एमएच १४ बीटी ९८१८) चालकाने आपल्या ताब्यातील वाहन हलगर्जीपणाने चालवून कारला (क्र. एमएच १७ एजे २८१५) जोराची धडक दिली. या अपघातात कादीर शेख यांचा मृत्यू झाला, तर नजीर गुलाब सय्यद (रा. कानडगाव, ता. राहुरी) व राजू कमरउद्दीन शेख (रा. हसनापूर, ता. राहता) हे गंभीर जखमी झाले आहेत.
फिर्यादी आजिम कादीर शेख (वय ४०, रा. हसनापूर, ता. राहता) यांच्या तक्रारीवरून राहुरी पोलीस ठाण्यात बस चालक महेंद्र मगन पाटील (रा. बाडदे, ता. शिरपूर, जि. धुळे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पो.हे.कॉ. आवारे पुढील तपास करत आहेत.

Post a Comment