नगर तालुका (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील देऊळगावसिद्धी येथे पूर्ववैमनस्यातून एका कुटुंबावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले असून, हल्लेखोरांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मनी मंगळसूत्र तोडून पळ काढला. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अनिता शिवराम भोसले (वय ४०, रा.देऊळगावसिद्धी, ता.नगर) यांनी फिर्याद दिली आहे. १८ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. श्रीमंत जीवलाल चव्हाण आणि अनिता श्रीमंत चव्हाण (दोघे रा. देऊळगावसिद्धी) यांनी जुन्या वादातून अनिता भोसले यांच्या घरासमोर जाऊन वाद घातला. वादाचे रूपांतर मारहाणीत होऊन आरोपींनी कुऱ्हाडीने थेट डोक्यात वार केले. या हल्ल्यात अनिता भोसले आणि त्यांचा मुलगा संकेत भोसले हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
हल्ल्यादरम्यान आरोपींनी लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच अनिता भोसले यांच्या गळ्यातील सोन्याचे मनी मंगळसूत्र जबरदस्तीने तोडून नेले. या घटनेनंतर जखमींवर उपचार केल्यानंतर त्यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार गुंजाळ करत आहेत.

Post a Comment