भाजपाच्या महिला नगरसेविकेची इन्स्टाग्रामवर बदनामी; गुन्हा दाखल


श्रीरामपूर - श्रीरामपूर नगर पालिकेतील भाजपाच्या एका महिला नगरसेविकेची सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. अज्ञात व्यक्तीने इन्स्टाग्राम वर त्यांच्या विषयी बदनामीकारक फोटो आणि आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करून तो व्हायरल करत त्यांची बदनामी केली आहे. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात विनयभंग व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत महिला नगरसेविका यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, १६ जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास जेव्हा त्यांनी स्वतःच्या मोबाईलवर इन्स्टाग्राम चालू केले, तेव्हा 'shrirampur.-०५' या इन्स्टाग्राम अकाऊंट धारकाने त्यांचे बदनामीकारक फोटो आणि आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करून तो व्हायरल केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. 

या प्रकारामुळे नातेवाईक, मित्रपरिवार आणि समाजात त्यांची मोठी बदनामी झाली असून, त्यांना मानसिक व सामाजिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित इन्स्टाग्राम धारकाविरुद्ध विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या (आयटी ॲक्ट) विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल खैरे करत आहेत.

0/Post a Comment/Comments