पारनेर विधानसभा मतदारसंघात ३० जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर



अहिल्यानगर - महसूल विभागाच्या विविध सेवा तळागाळातील नागरिकांपर्यंत गतिमानपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने पारनेर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी ३० जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता भाळवणी (ता. पारनेर) येथील नंदनवन लॉन्स येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरातील विविध सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार गायत्री सौंदाणे यांनी केले आहे.

शासनाचा महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात समाधान शिबिर आयोजित करण्याचे निर्देश महसूल व वन विभागाने दि. ९ जुलै २०२६ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे दिले आहेत. त्यानुसार या शिबिरात विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन, अर्ज स्वीकृती, तक्रारींचे निवारण तसेच प्रलंबित प्रकरणांवर तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे.

शिबिरात शासनाच्या निर्णयानुसार राज्यातील महिलांना शेतकरी दर्जाबाबत प्रमाणपत्रांचे वितरण, गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद वाटप, मुख्यमंत्री बळीराजा शेत व पाणंद रस्ते योजना, शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करणे, तुकडेबंदी कायद्याच्या विरुद्ध झालेल्या खरेदी-विक्री व्यवहार व हस्तांतरणाबाबत गावनिहाय यादी व कार्यवाही, 'जिवंत सातबारा' मोहीम, सिंधी विस्थापितांच्या निवासी व वाणिज्यिक जमिनी फ्री-होल्ड करण्यासाठी विशेष अभय योजना-२०२५ ला मुदतवाढ, राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना, घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष तरतूद, कुंभार समाजासाठी पारंपरिक व्यवसायास सवलती, शेतजमिनीच्या कौटुंबिक वाटणीपत्रावरील नोंदणी शुल्क माफी, सामाजिक अर्थसहाय्य योजना, प्रलंबित फेरफार निकाली काढणे, ई-मोजणी, अॅग्रीस्टॅक, पीएम-किसान तक्रार निवारण तसेच विविध विभागांच्या लाभाच्या योजनांचा समावेश आहे.

या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संबंधित ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी अथवा पारनेर तहसील कार्यालयातील कुळकायदा शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार गायत्री सौंदाणे यांनी केले आहे.


 

0/Post a Comment/Comments