भररस्त्यात ठेकेदाराला अडवून मारहाण करत लुटले, रोकड आणि मोबाईल केला लंपास


अहिल्यानगर - शहरातील तपोवन रोड परिसरामध्ये दोन अनोळखी इसमांनी एका ठेकेदाराच्या गाडीला कट मारल्याचा बहाणा करून त्यांना जबरदस्तीने गाडीखाली उतरवले आणि फायबरच्या पाईपने डोक्यात मारून जखमी करत २७ हजार रुपयांची रोकड आणि मोबाईल फोन लुटल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शिवाजी भानुदास वाघमोडे (वय ४१, रा. सिद्धीविनायक नगर, जुना पिंपळगाव रोड, तपोवन रोड, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे व्यवसायाने ठेकेदार आहेत. १ जुलै रात्री १० वाजेच्या सुमारास ते तपोवन रोडवर मंदिराच्या जवळ कामगारांना सोडून आपल्या स्कॉर्पिओ गाडीने घरी चालले होते. स्वराज्य ट्रेडर्स जवळ आले असता, पाठीमागून काळ्या रंगाच्या मोपेड दुचाकीवरून दोन अनोळखी इसम आले. त्यांनी वाघमोडे यांच्या गाडीला कट मारल्याचे कारणावरून वाद घालण्यास सुरुवात केली आणि शिवीगाळ करत एका इसमाने त्यांना शर्ट धरून गाडीबाहेर ओढले. त्यानंतर दुसऱ्या इसमाने हातातील फायबरच्या पाईपने वाघमोडे यांच्या डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले. एवढ्यावरच न थांबता संशयित आरोपींनी जबरदस्तीने त्यांच्याच गाडीमध्ये बसून त्यांना भिस्तबाग चौकातून पुढे सावेडी गावाच्या दिशेने रस्त्याच्या कडेला नेले. तिथे आरोपींनी वाघमोडे यांच्या खिशातील २७ हजार रुपयांची रोकड आणि विवो कंपनीचा मोबाईल फोन जबरदस्तीने काढून घेतला व जीवे मारण्याची धमकी दिली.

या घटनेनंतर जखमी अवस्थेतील वाघमोडे यांनी चुलत भाऊ अभिजीत वाघमोडे याला फोनवरून घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी शिवाजी वाघमोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी दोन अनोळखी इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०९(), १४०(), ३५१(), ३५२ आणि ३() अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर करत आहेत.


 

0/Post a Comment/Comments