अहिल्यानगर - शहरातील बुरूडगाव रोडवरील चाणक्य चौक येथील श्री संत भगवानबाबा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या शाखेत ठेवदारांनी ठेवलेली मुदत ठेव (फिक्स डिपॉझिट) व्याजासह परत न करता तब्बल २ कोटी ४४ लाख ४२ हजार ३७७ रुपयांची फसवणूक व अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मल्टिस्टेटचे चेअरमन, संचालक अशा ७ जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सतीश रामचंद्र पटारे (वय ५४, रा. गुगळे कॉलनी, बुऱ्हाणनगर, ता. नगर) यांनी १६ जुलै रोजी फिर्याद दिली आहे. ३ एप्रिल २०२३ ते २३ जानेवारी २०२५ या कालावधीत फिर्यादी तसेच इतर ठेवीदारांनी श्री संत भगवानबाबा मल्टिस्टेटच्या (मुख्य कार्यालय - गुलाबनगर, बालमटाकळी, ता.शेवगाव) नगर शहरातील चाणक्य चौक (बुरुडगाव रोड) शाखेत लाखो रुपयांच्या ठेवी ठेवल्या होत्या. ठेवीची मुदत पूर्ण झाल्यानंतर ठेवीदारांनी मल्टिस्टेटकडे आपल्या रक्कमेची मागणी केली. मात्र, मल्टिस्टेटच्या व्यवस्थापनाने ही रक्कम व्याजासह परत न करता, ती स्वतःच्या फायद्यासाठी वापरून संस्थेची व ठेवीदारांची मोठी फसवणूक केली. फिर्यादी व इतर ठेवीदार यांची फसवणूक झालेली रक्कम तब्बल २ कोटी ४४ लाख ४२ हजार ३७७ रुपये एवढी आहे.
या फसवणूक प्रकरणी मल्टिस्टेटच्या चेअरमन मंदाकिनी रंगनाथ वैद्य, व्हा.चेअरमन मयुर रंगनाथ वैद्य (रा.बालमटाकळी, ता.शेवगाव), संचालक नितीन सोपानराव तुपे ( रा. आगरकर मळा, अहिल्यानगर), संचालक शांतीनाथ नागनाथ साखरे, संचालक राम लक्ष्मण पोपळघट, संचालक किशोर अनिल सुरवसे, आणि संचालक/सीईओ जयशाली मयुर वैद्य (सर्व रा. बाळमटाकळी, ता. शेवगाव) यांच्या विरोधात कोतवाली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१६(५), ३१८(४), ३(५) सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे या आर्थिक गैरव्यवहाराचा पुढील तपास करत आहेत.

Post a Comment