कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना निकृष्ट व बोगस भुईमूग बियाण्यांचे वाटप, कृषीमंत्र्यांकडे तक्रार


श्रीगोंदा - खरीप हंगामाच्या तोंडावर श्रीगोंदा तालुक्यासह संपूर्ण राज्यात वितरित करण्यासाठी आलेल्या भुईमूग बियाण्यांच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. राष्ट्रीय खाद्यतेल अभियान योजनेंतर्गत वितरित करण्यात आलेल्या या बियाण्यांची उगवण क्षमता अत्यंत कमी असून, त्यांची प्रतवारी निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

या गंभीर प्रकरणी स्वराज्य जनजागृती परिषदेचे टिळक भोस यांनी राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आणि कृषी आयुक्त सुरज मांढरे यांच्याकडे लेखी तक्रार करून संबंधित दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे. यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, या बियाण्यांमधील शेंगांचा आकार अत्यंत लहान असून गुणवत्ता अत्यंत निकृष्ट आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी हे बियाणे घेण्यास थेट नकार दिला असून, खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच अशा प्रकारच्या बोगस बियाण्यांचा पुरवठा झाल्याने बळीराजा मध्ये तीव्र नाराजी व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणाची श्रीगोंदा तालुक्याच्या कृषी अधिकारी क्रांती चौधरी यांना कोणतीही पूर्वकल्पना किंवा माहिती नव्हती, असा आरोप तक्रार पत्रात करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी स्वतः कृषी कार्यालयात जाऊन हा प्रकार निदर्शनास आणून दिल्यानंतर या बियाण्यांचे वाटप थांबवण्यात आले. शासनाकडून आलेले बियाणे योग्य आहे की नाही, याची पूर्वतपासणी करण्याची जबाबदारी असताना अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत असून, हा केवळ श्रीगोंदा तालुक्यापुरता मर्यादित नसून राज्यभरात असा बोगस साठा वितरित झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाबीज यंत्रणा आणि कृषी विभाग शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत असल्याचा दावा करत असताना, अशा प्रकारे बोगस बियाण्यांचा पुरवठा करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या भवितव्याशी खेळण्यासारखे आहे. यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊन उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर स्वराज्य जनजागृती परिषदेने श्रीगोंदा व नगर तालुक्यात वितरित झालेल्या बियाण्यांची प्रयोगशाळेत तात्काळ तपासणी करावी, बियाणे पुरवठादार व बेजबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे.

त्याचप्रमाणे बाधित शेतकऱ्यांना त्वरित दर्जेदार बियाण्यांचा पर्यायी पुरवठा करून आर्थिक भरपाई देण्यात यावी, कामात हलगर्जीपणा करणाऱ्या तालुका कृषी अधिकारी क्रांती चौधरी यांची चौकशी व्हावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी जिल्हा पातळीवर विशेष तपास पथक नेमण्यात यावे, अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


 

0/Post a Comment/Comments