श्रीरामपूर - कोणतीही वैध वैद्यकीय पदवी अथवा शासनमान्यता नसताना नागरिकांवर उपचार करून त्यांच्या आरोग्याशी खेळणार्या एका कथित बोगस डॉक्टराविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणार्यांमध्ये खळबळ उडाली आहे. श्रीरामपूर शहरातील वॉर्ड क्रमांक 3 येथील गजानन क्लिनिकमध्ये एक व्यक्ती बेकायदेशीररीत्या वैद्यकीय व्यवसाय करत असल्याची तक्रार नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष सुभाष वैरागड यांच्याकडे प्राप्त झाली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर संबंधित क्लिनिकमध्ये विश्वास खैरनार हा डॉ. सुवर्णा खैरनार यांच्या नावाचा वापर करून त्यांच्या खुर्चीवर बसून रुग्णांची तपासणी करत असल्याचे निदर्शनास आले.
तसेच त्यांच्या लेटरपॅडचा वापर करून रुग्णांना औषधे देत असल्याचेही तपासात स्पष्ट झाले. याप्रकरणी डॉ. संतोष वैरागड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 710/2026 नोंद करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 318 तसेच महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम, 1961 मधील कलम 33(2) अन्वये 21 जुलै 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर श्रीरामपूर शहर पोलीस आणि तालुका आरोग्य विभागाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही व्यक्तीकडून उपचार घेण्यापूर्वी संबंधित डॉक्टरांची वैद्यकीय पात्रता आणि नोंदणीची खात्री करूनच उपचार घ्यावेत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
तसेच परिसरात अनधिकृत किंवा संशयास्पदरीत्या वैद्यकीय व्यवसाय करणारी व्यक्ती आढळल्यास त्याची माहिती तात्काळ पोलीस किंवा आरोग्य विभागाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही संयुक्त कारवाई वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत.

Post a Comment