अहिल्यानगर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा, हवामान खात्याचा 'येलो अलर्ट'


अहिल्यानगर -भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, अहिल्यानगर जिल्ह्यात ३ जुलै रोजी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्यता आहे. तसेच ४ जुलै रोजी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून जिल्ह्यासाठी "येलो अलर्ट" जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्धी पत्रक जारी करून जिल्ह्यातील नागरिकांना विशेष दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

प्रशासनाने नागरिकांना सूचित केले आहे की, मेघगर्जना आणि विजा चमकत असताना झाडांखाली किंवा मोकळ्या जागेत उभे राहू नये. विजांपासून संरक्षणासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा आणि भारत सरकारच्या "दामिनी ॲप"चा वापर करावा. वादळादरम्यान कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये, तसेच ट्रॅक्टर, शेतीची अवजारे व दुचाकी वाहनांपासून दूर राहावे. मोकळ्या मैदानात अडकल्यास जमिनीशी कमीत कमी संपर्क ठेवून गुडघ्यांवर बसून डोके व कान झाकून घ्यावेत. याशिवाय रस्त्यावरील जाहिरात फलक (होर्डिंग्ज), टॉवर्स, विद्युत खांब आणि जुनाट व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या आसपास आश्रय घेणे टाळावे.

नदी, ओढे आणि नाल्याकाठच्या नागरिकांनी पाणीपातळी वाढल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे आणि पाण्याचा प्रवाह वाहत असणारे पूल किंवा बंधारे ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. अतिवृष्टीमुळे भूस्खलन आणि दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी वेळीच सावध व्हावे व घाट रस्त्यांनी प्रवास करणे टाळावे. धरण व नदीक्षेत्रात पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी पाण्यात उतरू नये आणि धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी स्थानिक प्रशासन, पोलीस स्टेशन किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाच्या ०२४१-२३२३८४४, २३५६९४० किंवा ११२ आणि १०७७ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.


 

0/Post a Comment/Comments