भीषण अपघात… दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात टेम्पो चालकाचा दुर्दैवी मृत्यू


अहिल्यानगर – राँग साईडने भरधाव वेगात आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात टेम्पो नवीन उड्डाणपुलाच्या कॉलमला जाऊन जोरात धडकल्याने चालकाचा मृत्यू झाल्याची घटना ११ जुलै रोजी पहाटे एमआयडीसीतील सनफार्मा चौकात घडली. इरफान अन्वर शेख (वय ५५, रा.करडे, ता. शिरूर, जि. पुणे) असे मयत टेम्पो चालकाचे नाव आहे.

याबाबत त्यांचा मुलगा शोएब शेख यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मयत इरफान शेख हे ११ जुलै रोजी पहाटे त्यांचा टेम्पो घेवून एमआयडीसी कडे जात असताना सनफार्मा चौकात अचानक एकाने त्याच्या ताब्यातील दुचाकी अत्यंत हयगयीने आणि भरधाव वेगात चालवून रस्त्याच्या चुकीच्या बाजूने आणले. समोरून भरधाव वेगात येणाऱ्या या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात टेम्पो चालकाने आपले वाहन बाजूला घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

मात्र, दुर्दैवाने ताबा सुटल्यामुळे हा टेम्पो रस्त्याशेजारी असलेल्या नवीन पुलाच्या कॉलमला जाऊन जोरात धडकला. या भीषण धडकेत टेम्पो चालकाला गंभीर दुखापत झाली आणि त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 


0/Post a Comment/Comments