नगरमधील एमडी ड्रग्ज तस्करी रॅकेटमध्ये आणखी तिघांचा सहभाग उघड, पोलिसांनी केली अटक


अहिल्यानगर - नगरमध्ये 150 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त झालेल्या प्रकरणात तोफखाना पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली आहे. या तिघांचा मुकुंदनगरसह शहरातील विविध भागांत ड्रग्ज विक्री करण्यामध्ये सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. न्यायालयाने तिनही संशयित आरोपींना 24 जुलैपर्यंत कोठडी सुनावली असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि ड्रग्ज पुरवठ्याची संपूर्ण साखळी उघड करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

अली शकील शेख (वय 19, रा. गोविंदपुरा), दानिश फारूख शेख (वय 29, रा. जुना घासगल्ली) आणि कासिफ सज्जाद खान (वय 26, रा. जुना मुकुंदनगर) अशी नव्याने अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

यापूर्वी अटक करण्यात आलेले झिशान सय्यद, रेहान शेख आणि वसीम बागवान यांच्या चौकशीतून या तिघांची नावे समोर आली. यानंतर पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा कारवाई करून या तिघांना ताब्यात घेत अटक केली. रविवारी (19 जुलै) तोफखाना पोलिसांचे गुन्हे शोध पथक सावेडी परिसरात गस्त घालत असताना मिस्किनमळा येथे एक कार संशयास्पदरीत्या फिरताना आढळली. पोलिसांनी वाहन अडविण्याचा प्रयत्न केला असता दोन जण घटनास्थळावरून पसार झाले, तर झिशान सय्यद, रेहान शेख आणि वसीम बागवान यांना ताब्यात घेण्यात आले. वाहनाची झडती घेतली असता सुमारे 150 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला.

याशिवाय पिस्तुलासारखे दिसणारे लायटर, एअर गन, मास्क, कटावणी तसेच दरोड्यासाठी वापरता येईल असे साहित्यही पोलिसांनी हस्तगत केले. मंगळवारी संशयित आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. ड्रग्जचा मूळ पुरवठादार कोण, शहरात ड्रग्जचा साठा कुठून आणला जातो, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, तसेच पसार असलेल्या जमीर निसार शेख आणि इतर संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य करत तिन्ही संशयित आरोपींना 24 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

प्राथमिक चौकशीत अटक केलेल्या संशयित आरोपींनी हे ड्रग्ज जमीरशेख (रा. मुकुंदनगर) याच्याकडून मिळाल्याची कबुली दिली. त्यानंतर तपासाची दिशा बदलली. पुढील चौकशीत मुकुंदनगरसह शहरातील विविध भागांत एमडीची विक्री करणार्‍यांची नावे समोर आली. त्यानुसार पोलिसांनी अली शेख, दानिश शेख आणि कासिफ खान यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. तपासात त्यांचा ड्रग्ज विक्रीमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली.

नगर शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात एमडी जप्त होण्याची ही पहिलीच घटना आहे. संशयास्पद कारवरून सुरू झालेल्या कारवाईतून शहरात सक्रिय असलेल्या ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे समोर आले असले, तरी या रॅकेटचा मुख्य सूत्रधार अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे शहरात ड्रग्जचा पुरवठा नेमका कुठून होत आहे, त्यामागे कोणते मोठे नेटवर्क कार्यरत आहे आणि त्यात आणखी किती जण सहभागी आहेत, याचा उलगडा करणे तपास यंत्रणेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.


 

0/Post a Comment/Comments