पारनेरमध्ये वकिलाला भररस्त्यात गाठले; तलवारीने कापण्याची आणि हातपाय तोडण्याची धमकी, पुढे घडले असे...



पारनेर - पारनेर येथील एका वकिलाला जुन्या वादातून रस्त्यात गाडी आडवी लावून अडवत तलवारीने व कोयत्याने कापण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोघाजणांच्या विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वकील उन्मेश भाऊसाहेब चौधरी (वय ३४, रा. गणपती फाटा, कन्हेर ओहोळ, ता. पारनेर) यांनी फिर्याद दिली आहे. 

भररस्त्यात गाडी अडवून राडा

मिळालेल्या माहितीनुसार, १४ जुलै रोजी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी वकील उन्मेश चौधरी यांना आनंद खाडे याच्या मोबाईल नंबरवरून फोन आला आणि त्याने "तुम्ही के. के. गार्डन येथे या, मला तुमच्याशी अतुल औटी याच्याबद्दल बोलायचे आहे" असे सांगितले. फोन आल्यानंतर उन्मेश चौधरी हे त्यांचे साथीदार गणेश चंद्रकांत कावरे यांना सोबत घेऊन आपल्या मारुती स्विफ्ट कारमधून के. के. गार्डन समोरून जात होते. त्याच वेळी आरोपी आनंद खाडे (रा. जामगाव, ता. पारनेर) आणि अतुल औटी (रा. पारनेर) हे दोघे जण त्यांच्या ताब्यातील स्कुटी दुचाकीवरून आले आणि त्यांनी वकिलांच्या कारला समोरून आपली स्कुटी आडवी लावून कार थांबवण्यास भाग पाडले.

तलवारीचा धाक आणि पोलिसांत न जाण्यासाठी दबाव

गाडी थांबवल्यानंतर आरोपी अतुल औटी याने कारच्या दिशेने येत थेट दमदाटी सुरू केली. "तुम्ही माझ्या मॅटरमध्ये लक्ष घालायचे नाही, नाहीतर तुमचा काटा करू," अशी धमकी त्याने दिली. इतक्यावरच न थांबता आरोपी अतुल औटी व आनंद खाडे यांनी त्यांच्या शर्टच्या आत लपवून ठेवलेली तलवार आणि कोयता बाहेर काढले. "तुला तलवारीने व कोयत्याने तोडून टाकू," असा दम भरत त्यांनी परिसरात दहशत निर्माण केली. या प्रकारामुळे घाबरून वकील आणि त्यांचे साथीदार कारमधून खाली उतरू लागताच आरोपी आपली स्कुटी चालू करून घटनास्थळावरून पळून गेले.

या घटनेनंतर फिर्यादी चौधरी हे पारनेर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी निघाले असता, आरोपी आनंद खाडे याने पुन्हा त्यांच्या मोबाईलवर फोन केला. "जर तू आमच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दिली, तर तुझे हातपाय मोडून टाकू," अशी थेट धमकी फोनवर दिली. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments