केडगाव मध्ये नागरी वस्तीत बिबट्याचा वावर, नागरिक भयभीत; वनविभागाने लावला पिंजरा


अहिल्यानगर - केडगाव मधील लिंक रोड परिसरातील रभाजी नगर भागातील रवी कोतकर यांच्या शेतामध्ये अनेक दिवसापासून बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास आले आहे. या परिसारात पोदार इंटरनॅशनल स्कूल ,कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल , पश्चिमेकडे जगदंबा शाळा, ओॲसिस  स्कूल अशा अनेक मोठमोठ्या शाळा आहेत. यामध्ये अनेक विद्यार्थी शाळेसाठी येतात. यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बिबट्याचा वावर असल्याचे वनविभागास पंधरा दिवसांपूर्वीच सांगितले गेले होते. बिबट्या व त्याची दोन पिल्ले अनेकांना दिसली होती. या भागातील शेतामध्ये वस्तीतील एका कुत्र्याचा बिबट्याने फडशा पाडला होता. घटनेनंतर त्यावेळेस देखील वनविभागाचे कर्मचारी आल्यानंतर त्यांनी परिसरात बिबट्या असल्याची खात्री केली होती. परंतु त्यांनी वस्तीवरील लोकांना अट अशी घातली की पिंजरा लावायचा असेल तर आपणच वाहनाची व्यवस्था करावी व पिंजरा अमुक या ठिकाणी  लावलेला आहे त्या ठिकाणा वरून आणून लावावा असे सांगण्यात आले.

२३ जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास कोतकर कुटुंबातील महिला जनावरासाठी चारा आणण्यासाठी गेली असता शेतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. सुदैवाने त्या बालंबाल बचावल्या आहेत. या घटनेनंतर पुन्हा वनविभागाला तात्काळ रात्री घटनेची माहिती सांगितली. 

कोतकर कुटुंबीयाला संपूर्ण रात्र बिबट्याच्या दहशतीखाली काढावी लागली. सकाळी वनविभागाचे कर्मचारी कोतकर कुटुंबाच्या घरी आले. त्यानंतर रवी कोतकर यांनी शेजारील वस्तीवरील ट्रॅक्टर बोलवत तो पिंजरा वन विभागाच्या आलेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने आपल्या शेतात लावला आहे. परंतु जोपर्यंत बिबट्या पिंजऱ्यात अडकत नाही तोपर्यंत हा परिसर मात्र बिबट्याच्या दहशतीखाली राहणार आहे.


 

0/Post a Comment/Comments