अहिल्यानगर - राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न विधानसभेत प्रभावीपणे मांडत श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी स्टिंग एनर्जी ड्रिंकच्या वाढत्या वापराबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. त्यामुळे याची तातडीने दखल घेत अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी शाळांच्या ५०० मीटर परिसरात स्टिंग एनर्जी ड्रिंक विक्रीबंदीचे निर्देश दिले आहेत.
स्टिंग एनर्जी ड्रिंकचे लहान मुलांच्या आरोग्यावर होणारे संभाव्य दुष्परिणाम लक्षात घेता, शाळांच्या परिसरात त्याची विक्री रोखण्याची मागणी आमदार पाचपुते यांनी सभागृहात केली. त्यांनी निदर्शनास आणून दिले की, या पेयाच्या बाटलीवरच लहान मुले व गर्भवती महिलांनी हे पेय सेवन करू नये, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना हे पेय सहज उपलब्ध होणे चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले.
या चर्चेनंतर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी विषयाची गंभीर दखल घेत, राज्यातील सर्व शाळांच्या ५०० मीटर परिसरात स्टिंग एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर बंदी घालण्याचे निर्देश देण्याची घोषणा केली. विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता आणि उज्ज्वल भवितव्य यासाठी आमदार विक्रम पाचपुते यांनी विधानसभेत मांडलेला हा मुद्दा महत्त्वपूर्ण ठरला असून, शासनानेही त्यावर तातडीने सकारात्मक भूमिका घेतली आहे.

Post a Comment