पारनेर - जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोसायटीच्या ठरावासाठी सोसायटीचा संचालक समजून ७ ते ८ अज्ञात व्यक्तींनी एका ५५ वर्षीय किराणा व्यावसायिकाचे भरदिवसा अपहरण केले. मात्र नंतर चूक लक्षात येताच त्याच्या हातातील दोन तोळ्याच्या सोन्याच्या २ अंगठ्या आणि गळ्यातील ५ तोळ्याची सोन्याची चेन हिसकावून घेत त्याला सोडून दिल्याची घटना पारनेर तालुक्यात १२ जुलै रोजी दुपारी घडली. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अशोक फुलाजी चेडे (वय ५५, रा. पारनेर) यांनी रात्री उशिरा फिर्याद दिली आहे. फिर्यादी चेडे हे किराणा व्यावसायिक असून ते वैयक्तिक कामानिमित्त पुणे जिल्ह्यातील चाकण येथे गेले होते. तेथील काम आटोपून ते ज्ञानेश्वर औटी यांच्या मालकीच्या लाल रंगाच्या मारुती ब्रेझा कारने (क्र.एम.एच.-१६ डी.सी. ५५७४) पारनेरकडे परत येत होते. १२ जुलै रोजी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास त्यांची कार नगर ते कल्याण महामार्गाने कर्जुले हर्या शिवारात पिंपळगाव रोठा जाणाऱ्या रस्त्याजवळ आली असता चेडे यांच्या कारला अचानक एका लाल रंगाच्या स्विफ्ट कारच्या चालकाने ओव्हरटेक करून गाडी आडवी मारली. त्याच वेळी उजव्या बाजूने दुसरी पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार येऊन थांबली. त्यामुळे चेडे यांच्या चालकाने आपली कार रस्त्याच्या कडेला घेतली. दोन्ही स्विफ्ट गाड्यांमधून उतरलेल्या ७ ते ८ अज्ञात इसमांनी कारमधील चालकाला आणि फिर्यादी चेडे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी अशोक चेडे यांना बळजबरीने ओढत लाल रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये डांबले आणि मांडओहळ धरणाच्या रस्त्याने धरणाजवळ घेऊन गेले.
अपहरणाच्या या थरारामुळे घाबरलेल्या चेडे यांनी आरोपींना, "तुम्ही कोण आहात आणि मला कशासाठी घेऊन जात आहात?" असे विचारले. त्यावर आरोपींनी "तुम्ही सोसायटीचे संचालक आहात म्हणून आम्ही तुम्हाला घेऊन चाललो आहे" असे सांगितले. त्यानंतर आरोपींनी त्यांचे नाव विचारले असता चेडे हे सोसायटीचे संचालक नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर आरोपींनी चेडे यांच्या हातातील दोन तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या आणि गळ्यातील पाच तोळे वजनाची सोन्याची चेन असे एकूण ७ तोळे दागिने बळजबरीने ओरबाडून घेतले आणि त्यांना रस्त्यात सोडून देऊन पळ काढला.
याप्रकरणी अशोक चेडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पारनेर पोलीस ठाण्यात अज्ञात ७ ते ८ आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १४०(३), ११९(१), ११५(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रणजित मारग या प्रकरणाचा पुढील तपास करत असून आरोपींचा शोध घेत आहेत.

Post a Comment