अहिल्यानगर - पुण्यातील बनावट दारू दुर्घटनेत निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच, अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे तातडीने बंद करण्याचे कडक आदेश दिले आहेत. या आदेशानुसार कोतवाली पोलिसांनी केडगावच्या भूषणनगर परिसरातील झेंडा चौकात नाकाबंदी करून एका संशयित चारचाकी वाहनातून बनावट दारू तयार करण्याचे साहित्य, रिकाम्या बाटल्या, झाकणे आणि बनावट लेबलसह मोठा साठा जप्त केला आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चारचाकी गाडीचा क्रमांक एमएच १२ एचव्ही ४६७८ असा आहे. या प्रकरणी पोलिसांनी वैभव बाळासाहेब जवक (रा. भूषण नगर, केडगाव) या आरोपीला अटक केली आहे. हा सर्व बनावट माल नाशिक शहरातून अहिल्यानगर जिल्ह्यात विक्रीसाठी आणण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आणि उपनिरीक्षक गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दौंड, विजय ठोंबरे, विशाल दळवी, विनोद बोरगे, राहुल शिंदे, सत्यम शिंदे, महेश पवार, संकेत धीवर, रमेश शिंदे, सचिन लोळगे तसेच महिला पोलीस अंमलदार रोहिणी दरंदले आणि पल्लवी रोहकले, तसेच राहुल गुंडू व अतुल कोतकर यांनी ही धाडसी कारवाई केली.

Post a Comment