रायतळे शिवारात मध्यरात्री थरार...घरात घुसून वृद्धाला मारहाण करत दागिने व रोकड चोरट्यांनी पळविली


सुपा - रात्रीच्या वेळी घरात घुसून एका वृद्धाला लाकडी दांडक्याने व लोखंडी गजाने बेदम मारहाण करत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना पारनेर तालुक्यातील रायतळे येथील चितळकर वस्तीवर घडली आहे. या जबरी चोरीच्या घटनेप्रकरणी चार अनोळखी चोरट्यांविरोधात सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रायतळे येथील चितळकर वस्तीवर राहणारे महेश मारुती चितळकर (वय २९) यांच्या घरात २३ जुलै रोजी पहाटे १२.५० वाजण्याच्या सुमारास चार अनोळखी चोरट्यांनी बेकायदेशीरपणे प्रवेश केला. चोरट्यांनी महेश यांचे आजोबा रामकृष्ण श्रीपती चितळकर (वय ९५) यांना लाकडी दांडक्याने आणि लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर जखमी केले.

त्यानंतर घरातील एकूण १लाख ३५ हजार  रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम बळजबरीने चोरून नेली. या घटनेत वृद्ध रामकृष्ण चितळकर हे जखमी झाले आहेत.

याप्रकरणी महेश चितळकर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून २३ जुलै रोजी रात्री सुपा पोलीस ठाण्यात चार अनोळखी इसमांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०९() नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सुपा पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कोठूळे या दरोड्याचा पुढील तपास करत आहेत.



0/Post a Comment/Comments