सुपा - हंगा शिवारातील नगरपंचायतीच्या विहिरीवरून पारनेर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या इलेक्ट्रिक मोटारीची सुमारे ३०० मीटर लांबीची केबल अज्ञात भामट्याने चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारनेर नगरपंचायतीचे लिपीक मारुती तुकाराम ठोंबरे (वय २९, रा. पारनेर) यांनी याप्रकरणी तक्रार नोंदवली आहे. १८ जुलै रोजी सकाळी ८:३० वाजेच्या पूर्वी हंगा शिवारातील नगरपंचायतीच्या विहिरीवर लावलेल्या इलेक्ट्रिक मोटारीची सुमारे २० हजार रुपये किमतीची ३०० मीटर लांबीची विद्युत केबल अज्ञात चोरट्याने चोरून नेली.
नगरपंचायतीच्या मालमत्तेची चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर मारुती ठोंबरे यांनी सुपा पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०५(ई) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सुपा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार माळवदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Post a Comment