कायनेटिक कंपनीत दारूच्या नशेत दोघांकडून तुफान राडा, इंजिनिअरला केली मारहाण


अहिल्यानगर - अरणगाव रोडवर असलेल्या कायनेटीक कंपनीत एका ट्रेनी इंजिनिअरला दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून कंपनीच्याच माजी कर्मचाऱ्यांनी चापटीने मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना १२ जुलै रोजी दुपारी ३.३५ च्या सुमारास घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सुफियान अल्लाबक्ष इनामदार (वय २६, रा. म्हाडा बिल्डींग, नोबेल हॉस्पीटल जवळ, प्रेमदान चौक, अहिल्यानगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुफियान हे कायनेटीक कंपनी, अरणगाव रोड, अहिल्यानगर येथे ट्रेनी इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. तर आरोपी राहुल खंडागळे व यश सोनवणे (दोघे रा. कायनेटीक चौक, अहिल्यानगर) हे देखील याच कंपनीत काम करत होते, मात्र त्यांनी जून २०२६ मध्ये काम सोडले होते.

१२ जुलै रोजी दुपारी ३.३५ च्या सुमारास, दोन्ही आरोपी हे दारूच्या नशेत आपला जुना पगार घेण्यासाठी कंपनीत आले होते. तेथे त्यांची ओळख असलेल्या सुफियान यांच्याकडे आरोपींनी दारू पिण्यासाठी २०० रुपयांची मागणी केली. मात्र, सुफियान यांनी आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. याचाच राग मनात धरून आरोपींनी सुफियान यांना चापटीने मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच "तू आम्हाला पैसे दिले नाही, तुझ्याकडे पाहून घेतो" अशी धमकी देत शिवीगाळ व दमदाटी केली.

या घटनेनंतर सुफियान इनामदार यांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी राहुल खंडागळे आणि यश सोनवणे यांच्याविरुद्ध भा.न्या.सं. कलम ११५(), ३५१(), ३५२ आणि ३() प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे करत आहेत.


 

0/Post a Comment/Comments