अहिल्यानगर - पंढरपूरकडे निघालेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पायी पालखी दिंडीत सहभागी असलेल्या एका ७८ वर्षीय वारकरी महिलेचा अहिल्यानगर शहरात झोपेतच मृत्यू झाल्याची घटना १३ जुलै रोजी पहाटे घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृत महिलेचे नाव सुमनबाई मधुकर कांडेकर (वय ७८, रा. जातेगाव, ता. जि. नाशिक) असे आहे. त्या पंढरपूरकडे जाणाऱ्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पायी पालखी दिंडीत सहभागी होत्या. १२ जुलै रोजी रात्री त्या मार्केट यार्ड परिसरातील हमाल पंचायत कार्यालयासमोर इतर वारकऱ्यांसह झोपल्या होत्या. १३ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास सहकाऱ्यांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या कोणताही प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात आल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी येथील शासकीय जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.
तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. काळे यांनी तपासणी करून त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेची माहिती रूग्णालय प्रशासनाकडून पोलिसांना देण्यात आल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असून, कोतवाली पोलीस पुढील तपास करीत आहेत. मयत सुमनबाई या गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी पायी वारी करत होत्या. त्यांच्या पश्चात पती, २ मुले, १ मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Post a Comment