नगर - पुणे महामार्गावर चास शिवारात भीषण अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू


नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर - पुणे महामार्गावरील चास (ता.नगर) शिवारात दोन दुचाकी आणि एका चारचाकी वाहनाचा विचित्र अपघात होऊन यामध्ये एका २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. केतन कानीफनाथ गवारे (रा. मु.पो. ब्रम्हगाव, ता. आष्टी, जि. बीड) असे अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

केतन गवारे हे १२ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास आपल्या ताब्यातील हिरो स्प्लेंडर मोटरसायकलवरून (क्र. एमएच १४ एमजे ५६४९) जात होते. याच वेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या होंडा युनिकॉर्न मोटरसायकल (क्र. एमएच २० एच सी ६७५९) चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवून केतन यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेमुळे केतन हे दुचाकीवरून रस्त्यावर खाली कोसळले आणि त्यांच्या डोक्याला व शरीरावर गंभीर दुखापत झाली.

याच दरम्यान, धडकेमुळे केतन यांची स्प्लेंडर दुचाकी नगरकडून पुणे बाजूकडे जाणाऱ्या रोडवर उडून पडली. त्याच वेळी नगरकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका चारचाकी कारने (क्र. एमएच ३१ ईयु ३५२९) या पडलेल्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातामध्ये कार व स्प्लेंडर मोटरसायकलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून गंभीर जखमी केतन गवारे यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

याप्रकरणी नितीन बाळासाहेब गवारे (वय ३२, रा. ब्रम्हगाव, ता. आष्टी, जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात आरोपी युनिकॉर्न चालक पवन जालिंदर सोनवणे (रा. मु.पो. भादली, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 


0/Post a Comment/Comments