अहिल्यानगर - शासकीय नोकरीचे आमिष दाखवून एका तरुणाची तब्बल १३ लाख ७५ हजार ६८० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत गोरख रघुनाथ लिपारे (वय ६५, रा. जलसा हॉटेल समोर, आलमगीर रोड, भिंगार) यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ऑक्टोबर २०२१ ते सप्टेंबर २०२२ दरम्यान हा फसवणुकीचा प्रकार घडला. आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलाला शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवले होते. त्यानंतर विश्वास संपादन करून बनावट कार्यालयीन आदेश आणि खोटे शिक्के मारून बनावट कागदपत्रे तयार केली. या बदल्यात त्यांनी फिर्यादीकडून वेळोवेळी १३ लाख ७५ हजार ६८० रुपये उकळले. मात्र, पैसे घेऊनही मुलाला नोकरी न लावता विश्वासघात करत आर्थिक फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर लिपारे यांनी पोलिसांत धाव घेतली.
या प्रकरणी हुसेन शहाबुद्दीन पठाण (रा. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर), दिनेश बबनराव लहारे (रा. आरणगाव, ता. नगर), कमलेश पदमाकर गांधीलकर उर्फ आदित्य कुलकर्णी (रा. मालेगाव, जि. नाशिक), जावेद अब्बास पटेल आणि अब्बास पटेल (दोघे रा. समता कॉलनी, गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) या पाच आरोपींविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ४२०, ४०६, ४६८, ४७१, ४७२ आणि ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महिला स.पो.नि. तेजश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पवार करत आहेत.

Post a Comment