नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर तालुक्यातील वाळकी गावाच्या बाहेरून जाणारा खुपच जुना व वाहतुकीचा चालू असलेला शासकीय रस्ता एका शेतकऱ्याने तारेचे कुंपण घालून अडविला आहे . या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी , नुतनीकरणासाठी शासनाने कोट्यावधी रुपयांचा निधी वापरला आहे . मात्र आमच्या शेतातून रस्ता गेल्याचा साक्षात्कार शेतकऱ्याला झाला असल्याने तो रस्ताच तारेचे कुंपण घालत बंद करण्यात आला आहे . सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबतची दखल घेतली असून संबंधीत शेतकऱ्याला स्वखर्चाने रस्ता वाहतूकीस खुला करून द्यावा . अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नोटीसीद्वारे संबंधीत शेतकऱ्याला दिला.
नगर तालुक्यातील वाळकी गावाबाहेरून साकत, तांदळी वडगाव, वडगाव तांदळी, रुईछत्तीशी, दहीगाव, वाटेफळ आदी गावांना जोडणारा जुना सार्वजनिक रस्ता आहे . या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नदीवर पूल बांधण्यात आला आहे . याच रस्त्यावर खडीकरण , डांबरी करणासाठी वारंवार निधी खर्च करण्यात आला आहे . मात्र रस्ताच आमच्या शेतातून गेला म्हणत संबंधीत शेतकऱ्याने तारेचे कुंपण घालत चालू रस्ताच बंद करून टाकल्याने परिसरातील नागरिक, शेतकरी, वाहनचालक आणि प्रवाशांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे. संबंधित रस्ता तातडीने वाहतुकीसाठी खुला करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील सुमारे ३०० ते ४०० मीटर लांबीचा हा जुना वहिवाटीचा रस्ता अनेक वर्षांपासून वापरात आहे. रस्त्यावर डांबरीकरण , खडीकरण , पुल उभारणी साठी शासकीय निधी अनेक वेळा खर्च करण्यात आला आहे . संबंधित रस्त्यावर स्थानिक शेतकऱ्याने तारेचे कुंपण घालत रस्ताच बंद केल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक आता गावातील मुख्य चौकातून वळवावी लागत आहे. बाजारपेठेचे गाव असल्याने रोजच वाहनांची व नागरिकांची वर्दळ असते. आठवडे बाजाराच्या दिवशी गावात व्यापारी, शेतकरी, ग्राहक आणि विविध वाहनांची मोठी गर्दी होते. अशा परिस्थितीत गावाबाहेरील पर्यायी रस्ता बंद केल्याने एसटी बस, शालेय वाहने, ट्रॅक्टर, मालवाहू व इतर अवजड वाहने देखील मुख्य चौकातूनच जात असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे . प्रशासनाने हस्तक्षेप करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
दरम्यान या संदर्भात बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता सचिन चव्हाण यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात रस्ता बंद केल्याप्रकरणी फिर्याद दिली आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी अमोल रामदास गव्हाणे (रा.वाळकी,ता.नगर) यांच्या विरुद्ध बीएनएस कलम २२१ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, तहसीलदार, मंडल अधिकारी आणि तलाठी यांनी संयुक्तपणे घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला आहे . संबंधीत शेतकऱ्याला स्वखर्चाने रस्ता खुला करून देण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे . दोन दिवसात रस्त्यावरील तारेचे कुंपण काढले नाही तर संबंधीत शेतकऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. (बापुसाहेब वराळे - सार्वजनिक बांधकाम विभाग )

Post a Comment