केडगावच्या लिंक रोडवर रिक्षाचालकाने दोन मजुरांना मारहाण करत लुटले



अहिल्यानगर - केडगाव परिसरातील लिंक रोडवर एका निर्जन स्थळी अनोळखी रिक्षाचालकाने दोन मजुरांना बेदम मारहाण करत लुटल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत रोख रकमेसह मोबाईल व चांदीची चेन असा एकूण ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून पोबारा केला. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शाहूनगर (केडगाव) येथे राहणारे गवंडी कामगार बादल भारत रामरज्जत आणि त्यांचे मित्र गुन्हागार राम निषाद हे दोघे २१ जुलैच्या रात्री दहा वाजेच्या सुमारास लिंक रोडने जात होते. त्यावेळी एका अनोळखी रिक्षाचालकाने आपली रिक्षा एका निर्जन ठिकाणी थांबवली. त्यानंतर त्याने बादल रामरज्जत आणि गुन्हागार निषाद या दोघांशी वाद घालत त्यांना शिवीगाळ केली.

रिक्षाचालकाने दोघांनाही लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर त्याने बादल यांच्या जवळील १० हजार रुपये रोख आणि मोबाईल, तर गुन्हागार निषाद यांच्या जवळील ११ हजार रुपये रोख, ९ हजार ५०० रुपये किंमतीची चांदीची चेन आणि ८ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ३९ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला व तेथून पळ काढला.

घटनेनंतर पीडितांनी कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन आपबीती सांगितली. बादल रामरज्जत यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे आणि पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे करत आहेत.


 

0/Post a Comment/Comments