मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा विक्रम, नेमकं काय घडलं?



मुंबई - महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक नवा ऐतिहासिक विक्रम नोंदवला गेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक काळ पद भूषवणाऱ्या नेत्यांच्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. १२ जुलै २०२६ पर्यंत देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून एकूण कार्यकाळ २४३० दिवस (सुमारे ६ वर्षे ७ महिने) इतका झाला आहे. या विक्रमासह त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचा २४१२ दिवसांचा विक्रम मागे टाकला आहे. सध्या देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून तिसरा कार्यकाळ सुरू असल्याने हा आकडा आणि त्यांचा हा विक्रम दररोज आणखी वाढत आहे.

महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांमध्ये वसंतराव नाईक यांचा एकूण कार्यकाळ ४०९६ दिवस (११ वर्षे ७८ दिवस) इतका असून, त्यांचा पहिला क्रमांक आहे. तर दुसरा क्रमांक विलासराव देशमुख यांचा असून, ते २६८६ दिवस (सुमारे ७ वर्षे १२९ दिवस) एवढ्या कालावधीपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांचा २४३० दिवस (१२ जुलै २०२६ पर्यंत आणि कार्यकाळ सुरू) इतक्या कालावधीपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहण्यात तिसरा नंबर लागला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे २४१२ दिवस (सुमारे ६ वर्षे २२१ दिवस)महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांचा राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांमध्ये चौथा क्रमांक आहे. शरद पवार हे चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले मात्र, त्यांना एकदाही पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही.

फडणवीसांकडे तीन वेळा मुख्यमंत्रिपदाची धुरा

देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत तीन वेळा महाराष्ट्राचे (Maharashtra) मुख्यमंत्रिपद भूषवले आहे. त्यांचा पहिला कार्यकाळ (२०१४-२०१९) त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला होता. त्यानंतरचा दुसरा कार्यकाळ अवघ्या ६ दिवसांचा ठरला होता. तर, सध्या सुरू असलेल्या त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळाने १२ जुलै २०२६ पर्यंत ५८५ दिवस पूर्ण केले असून हा कार्यकाळ अविरतपणे सुरू आहे.

घरातूनच राजकारणाचे बाळकडू

देवेंद्र फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी नागपूरमध्ये (Nagpur) झाला. वडील गंगाधर फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी आणि आमदार होते. त्यामुळे त्यांच्यावर घरातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा पगडा राहिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार आणि नागपूर शाखेतील शिस्तीमुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वगुणाचा पाया भक्कम झाला. तसेच त्यांना राजकारणाचे बाळकडू वडील गंगाधर फडणवीस आणि पाच वेळा आमदार राहिलेल्या काकू शोभाताई फडणवीस यांच्याकडून मिळाले.

बूथ कार्यकर्ता, नगरसेवक ते मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस यांचा नागपूरमधील एक सामान्य बूथ कार्यकर्ता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा प्रवास अत्यंत थक्क करणारा आणि राजकीय वर्तुळात प्रेरणादायी राहिला आहे. त्यांनी महाविद्यालयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) सक्रिय कार्यकर्ते म्हणून आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली. नागपूर विद्यापीठातून १९९२ मध्ये कायद्याची (एलएलबी) पदवी घेत असतानाच त्यांनी महानगरपालिका निवडणुकीत उतरून नगरसेवक म्हणून विजय मिळवला. 

१९९२ ते २००१ या काळात नगरसेवक म्हणून काम करतानाच त्यांनी नागपूरचे महापौरपदही भूषवले. महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये एकेकाळी वार्डातील बूथ सांभाळणारा कार्यकर्ता नगरसेवक होऊन नंतर महापौर झाला. त्यानंतर आमदार, मुख्यमंत्री, राज्याचा विरोधी पक्षनेता आणि पुन्हा मुख्यमंत्री असा राजकीय प्रवास असणारा नेता आज महाराष्ट्राचा सलग सर्वाधिक काळ मुख्यमंत्री असणारा नेता बनला आहे.




0/Post a Comment/Comments