दिल्लीत मोठ्या हालचालींना वेग, मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना, उपमुख्यमंत्री शिंदेही जाणार


मुंबई – विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर केंद्र सरकार नरमले असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आता तातडीने दिल्लीकडे रवाना झाले आहेत.

देवेंद्र फडणवीस दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे आता फडणवीसांना केंद्रात संधी मिळणार का? असा प्रश्न देखील आता उपस्थित होत आहे. सोबतच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा तातडीने दिल्लीला रवाना होणार असल्याचे समजते.

राज्यात आणि केंद्रात बदल?


महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार असल्याची चर्चा होती. सोबतच आता शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळातही फेरबदल होणार असल्याचे समजते. या साऱ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीहून निमंत्रण आले आहे. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे केंद्रासोबत राज्यात नेमके काय बदल होणार, याची उत्सुकता लागली आहे.

युवा शक्तीचा प्रचंड विजय

याबाबत प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मला वाटते की हा विद्यार्थ्यांचा आणि युवा शक्तीचा प्रचंड विजय आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. परंतु, आता ज्या बातम्या येत आहेत की धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा सादर केला आहे. पंतप्रधानांनी स्वीकारला आहे का? पर्यायी व्यवस्था काय केली आहे, याबद्दल अद्याप आपल्याला माहीत नाही. परंतु, हा लोकशाहीमधला प्रचंड मोठा विजय आहे आणि हा मोदी सरकारच्या काळातला पहिला जबाबदारी स्वीकारून दिलेला राजीनामा आहे. याला एका वाक्यात सांगायचे झाले तर धिस इज द बिगिनिंग ऑफ द एंड.

विद्यार्थ्यांच्या समोर सरकारला झुकावे लागले

पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, हे सरकार फार काळ टिकणार नाही. मोदी सरकारचा मनमानी कारभार यापुढे जनता स्वीकारणार नाही, हे यातून सिद्ध झाले आहे. जो दबाव निर्माण झाला होता विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे त्यामुळे सरकारला भाग पाडले गेले आहे. हा निर्णय संसदेच्या अधिवेशनाच्या आधी झाला असता तर संसदेचे कामकाज सुरळीत पार पडले असते. कदाचित ठोस उपाययोजना करता आली असती. पण आत्तापर्यंत सरकारची कारकीर्द पाहता स्वतःची चूक कधी स्वीकारायची नाही आणि हट्टीपणाने सरकार चालवायचे हे 12 वर्षे आपण पाहिले. पण आता विद्यार्थ्यांच्या समोर सरकारला झुकावे लागले आहे.
 




0/Post a Comment/Comments