पारनेर - पारनेर ते सुपा रोडवर दोन अनोळखी भामट्यांनी स्वतः पोलीस असल्याची खोटी बतावणी करून एका वृद्ध शेतकऱ्याला थांबवले आणि त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची दोन तोळे वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने ओढून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात ठकबाजीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी प्रभू बागल (वय ७१, रा. म्हसणे, ता. पारनेर) हे १ जुलै रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास कांद्याच्या मोकळ्या गोण्या घेऊन आपल्या मोटारसायकलने पारनेर कांदा मार्केटमधून आपल्या गावी म्हसणेकडे चालले होते. ते पारनेर ते सुपा जाणाऱ्या रोडवरील कन्हेर ओहोळ, गायकवाड वस्तीजवळ आले असता, मागून काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून (क्र. एमएच-०९४५ अपूर्ण) दोन अनोळखी इसम आले. त्यांनी बागल यांच्या दुचाकीला आडवे येऊन त्यांना थांबवले.
त्यानंतर, "आम्ही पोलीस आहोत" अशी बतावणी करत त्यांनी बागल यांना विचारले की, "तुमच्याजवळ गांजा आहे का? तुम्ही गांजा विकता अशी आम्हाला माहिती मिळाली आहे." असे म्हणून भामट्यांनी बागल यांचे खिसे तपासण्यास सुरुवात केली. यादरम्यान एका इसमाने बागल यांच्या गळ्यातील भगव्या रंगाचा पंचा ओढला आणि त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची दोन तोळे वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेतली. चैन हाती लागताच दोन्ही आरोपी दुचाकीवरून सुसाट वेगाने पसार झाले. या प्रकरणी पीडित शेतकरी शिवाजी बागल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलिसांनी दोन अनोळखी इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), २०४ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पो. हे.कॉ. कांबळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Post a Comment