अहिल्यानगर - अहिल्यानगरमधील सावेडी परिसरातील बिशप लॉयड कॉलनीत राहणाऱ्या एका ६९ वर्षीय सेवानिवृत्त स्टाफ नर्सची सायबर भामट्यांनी 'डिजिटल अरेस्ट' करून तब्बल ३१ लाख ७० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिला सावेडी येथील टीव्ही सेंटर रोडवरील बिशप लॉयड कॉलनीत सन २०१४ पासून एकट्याच राहत असून त्या सौदी अरेबिया येथे स्टाफ नर्स म्हणून नोकरी करत होत्या. त्यांना मिळणाऱ्या पेन्शन व ठेवींच्या (एफडी) व्याजातून त्या आपली उपजीविका भागवतात. १८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांच्या व्हॉट्सअॅपवर एका अज्ञात नंबरवरून कॉल आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख कुलाबा पोलीस स्टेशन, मुंबई येथील पोलीस इन्स्पेक्टर 'प्रताप' अशी दिली.
भामट्यांनी महिलेला सांगितले की, तुमचे अब्दुल सलाम नावाच्या दहशतवाद्याशी संबंध आहेत आणि तुमच्या नावावरील आधार कार्डाचा वापर करून मुंबईतील अंधेरी पूर्व येथील कॅनरा बँकेत ३ ऑक्टोबर २०२६ रोजी बँक खाते उघडण्यात आले आहे. या खात्यावरून दहशतवाद्यांना पैशांचे व्यवहार करण्यात आले असून तुमच्या नावावर अरेस्ट वॉरंट निघाले आहे, अशी खोटी भीती त्यांना दाखवण्यात आली. हे वॉरंट रद्द करण्यासाठी आणि खात्री पटवण्यासाठी दर दोन तासांनी 'आय ॲम ॲट होम' आणि झोपताना 'गुड नाइट' असे मेसेज पाठवण्यास सांगून त्यांना 'डिजिटल अरेस्ट' करण्यात आले.
दुसऱ्या दिवशी सायबर भामट्यांनी पुन्हा व्हॉट्सअॅप कॉल करून त्यांच्याकडे असलेल्या सोन्या-नाण्याची, एफडीची आणि बँक बॅलन्सची विचारणा केली. आरबीआयकडे सर्व रक्कम जमा करून प्रकरण क्लिअर करावे लागेल, असे सांगून त्यांना बँकेतील मुदत ठेव (एफडी) मोडण्यास भाग पाडण्यात आले. तसेच काही दागिने गहाण ठेवून आरबीएल बँकेतील खात्यावरून भामट्यांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांवर आरटीजीएसद्वारे ३१ लाख ७० हजार रुपयांची रक्कम पाठवण्यात आली.
भामट्यांनी १९ ऑक्टोबर रोजी २२ लाख ५० हजार आणि २१ ऑक्टोबर रोजी ९ लाख २० हजार रुपये असा एकूण ३१ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल ट्रान्सफर करून घेतला. त्यानंतर २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता फिर्यादीने त्या नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन उचलला गेला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ सायबर पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदवली. या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (ड)आणि बीएनएस कलम ३१८ (४), ३१९ (२)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment