अहिल्यानगर- केडगाव येथील भूषणनगर भागात राहणाऱ्या एका ६९ वर्षीय सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याच्या मोबाईलमध्ये संशयास्पद एपीके फाईल पाठवून ती डाऊनलोड झाल्यावर त्यांचा मोबाईल हॅक करत सायबर भामट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून १ लाख ९६ हजार २०० रुपये परस्पर काढून घेत ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अरुण उदेसिंग पाटील (रा. भूषणनगर, केडगाव, अहिल्यानगर) यांनी २३ ऑक्टोबर रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे २०१७ मध्ये रेल्वे विभागातून स्टेशन प्रबंधक कार्यालय कर्मचारी पदावरून सेवानिवृत्त झाले असून, त्यांना मिळणाऱ्या पेन्शनवर त्यांच्या कुटुंबाची उपजीविका चालते. १८ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांच्या रेडमी १२ प्रो मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून 'Customer_Support_FUD.apk' ही फाईल आली. ती फाईल मोबाईलमध्ये डाऊनलोड झाल्यानंतर त्यांच्या नकळत गुगल पे द्वारे आर्थिक व्यवहार झाले.
फिर्यादींच्या पत्नीच्या बँक ऑफ बडोदा खात्यातून ७५ हजार रुपये आणि त्यांच्या मुलाच्या स्टेट बँक ऑफ इंडिया खात्यातून २६ हजार २०० रुपयांची रक्कम डेबिट झाल्याचे संदेश त्यांना प्राप्त झाले. त्यानंतर त्यांनी तात्काळ १९३० या हेल्पलाईन नंबरवर सायबर तक्रार नोंदवली. तपासादरम्यान ही रक्कम कॅनरा बँकेच्या एका खात्यात जमा झाल्याचे निदर्शनास आले.
हा प्रकार ताजा असतानाच, १९ ऑक्टोबर रोजी सकाळी फिर्यादीच्या युको बँक खात्यातून आणखी ९५ हजार रुपये परस्पर डेबिट झाले. हे पैसे देखील एका दुसऱ्या बँक खात्यात वळते झाल्याचे समजले. अनोळखी मोबाईल धारकाने पाठवलेली एपीके फाईल मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाल्यामुळेच त्यांच्या, पत्नीच्या आणि मुलाच्या खात्यातून एकूण १ लाख ९६ हजार २०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पाटील यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरुद्ध बीएनएस कलम ३१८ (४) नुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास महिला पोलीस अंमलदार तारडे करत आहेत.

Post a Comment