अहिल्यानगर - केडगाव येथील सोनेवाडी फाटा परिसरात एस. टी. बसची वाट पाहत उभ्या असलेल्या वृद्ध महिलेचा विश्वास संपादन करून तिची फसवणूक करत तिच्या जवळील ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने एका अनोळखी भामट्याने लांबवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वत्सलाबाई विश्वनाथ काळे (वय ७५, रा. मु. पो. सारोळा कासार, ता. नगर) या १ ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास केडगाव येथील सोनेवाडी फाट्यावर एस. टी. बसची वाट पाहत उभ्या होत्या. त्यावेळी तिथे आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने वत्सलाबाई यांना "मी तुमच्या मुलाला आबासाहेबला ओळखतो, तो माझा मित्र आहे, मी सारोळ्याला चाललो आहे तुला सोडवितो," असे गोड बोलून आपल्या मोटारसायकलवर बसवले.
मोटारसायकलवर बसल्यानंतर त्या महिलेची पिशवी मोटारसायकलच्या पेट्रोलच्या टाकीवर ठेवायला सांगून आरोपी तिच्याशी गप्पा मारत पुढे निघाला. या दरम्यान संधी साधून आरोपीने पिशवीत असलेल्या १५ ग्रॅम वजनाच्या व ८० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची परस्पर चोरी केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वत्सलाबाई काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३ (२) नुसार अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास स.फौ. गोविंद गोल्हार करत आहेत.

Post a Comment