अहिल्यानगर - बहुचर्चित जिल्हा सहकारी बॅकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न फोल ठरल्यानंतर आणखी काही जागा बिनविरोध करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांसह निवडणूक यंत्रणाही कमालीची सक्रिय झालेली दिसली. अर्ज माघारीची मुदत २१ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजताच संपलेली असताना सायंकाळी सातच्या दरम्यान नगर तालुका सेवा सोसायटी मतदारसंघातून आ. अक्षय कर्डिले यांची बिनविरोध निवड झाली. हे कमी काय म्हणून आज २२ ऑक्टोबर रोजी दुसर्या दिवशी चिन्ह वाटपाच्या वेळी जामखेड सेवा सोसायटी मतदारसंघातून सचिन घुमरे व श्रीगोंदे सेवा सोसायटी मतदारसंघातून दत्तात्रय पानसरे यांची बिनविरोध निवड झाल्याने निवडणूक विभागाच्या भुमिकेने सारेच आवक झाले आहेत. या निर्णयाविरोधात काही सामाजिक संघटना न्यायालयात जाणार आहेत.
यावर स्पष्टीकरण देताना निवडणूक विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले की, काल दुपारी तीन वाजता अर्ज मागे घेण्याच्या वेळी माघारीसाठी मोठी गर्दी झाली. ज्यांनी अर्ज मागे घेतले त्या प्रक्रियेत जास्त वेळ गेल्याने आम्ही आज चिन्ह वाटप करताना शिल्लक राहिलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आम्ही आज ज्यांचे अर्ज शिल्लक आहेत त्यांना चिन्ह वाटप करून अंतिम उमेदवारांच्या याद्या प्रसिध्द केल्या आहेत. ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व निपक्षपणे पार पाडल्याचा दावा निवडणूक विभागाकडून केला जात असला तरी अनेकांनी याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत न्यायालयात जाण्याचा इशारा दिल्याने ही निवडणूक कोणते नवे वळण घेते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
बिनविरोध झालेल्या ११ जागांपैकी १० जागा विखे-थोरात-गडाख गटाच्या असल्याचे उघड असून श्रीगोंदे मधून दत्ता पानसरे हे आमच्या पॅनलचे असल्याचा दावा खा. लंके यांनी केला आहे. सहकाराच्या राजकारणात पानसरे हे विखे यांच्याशी जवळीक साधून असतात त्यामुळे ते नक्की कुणाचे हा तूर्त संभ्रमच आहे. तर, जामखेडमधून बिनविरोध झालेले घुमरे हे राम शिंदे यांचे समर्थक आहेत.
बिनविरोध झालेल्या अकरा जागा
१) रणजीत देशमुख - संगमनेर सेवा सोसायटी मतदारसंघ
२) शंकरराव गडाख - नेवासा सेवा सोसायटी मतदारसंघ
३) बिपीन कोल्हे - कोपरगाव सेवा सोसायटी मतदारसंघ
४) राजश्री घुले - शेवगाव सेवा सोसायटी मतदारसंघ
५) करण ससाणे - श्रीरामपूर सेवा सोसायटी मतदारसंघ
६) सुजय विखे - राहाता सेवा सोसायटी मतदारसंघ
७) मोनिका राजळे - पाथर्डी सेवा सोसायटी मतदारसंघ
८) अक्षय कर्डिले- नगर तालुका सेवा सोसायटी मतदारसंघ
९) दत्तात्रय पानसरे - श्रीगोंदे सेवा सोसायटी मतदारसंघ
१०) सचिन घुमरे - जामखेड सेवा सोसायटी मतदारसंघ
११) सचिन जगताप - बिगर शेती मतदारसंघ

Post a Comment