जे नाही ललाटी, ते लिही तलाठी...जमिनीची केली परस्पर दुसऱ्याच्या नावे नोंद

 


अहमदनगर -  

खरेदी करून दिलेल्या मालमत्ते व्यतिरिक्त इतर मिळकतीचीही बेकायदेशीररित्या खरेदी घेणाराच्या नावे नोंद लावल्याचा प्रकार नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर येथे घडला आहे. त्यामुळे जे नाही ललाटी, ते लिही तलाठी...या म्हणीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. संगणमताने परस्पर नोंद लावणाऱ्या तलाठी व मंडळाधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी पांडुरंग भाऊ कर्डीले यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, बुऱ्हाणनगर येथील कर्डीले यांच्या वडिलोपार्जित मिळकतीपैकी  प्लॉट २२ ते २५ या मिळकती, नारायण निवृत्ती गाडेकर रा. कमल हौसिंग सोसायटी, अहमदनगर यांना दि. २३ मार्च २०२१ रोजी विकण्यात आली. यानुसार खरेदीदार यांच्या नावाची नोंद महसूल दफ्तरी रेकॉर्डप्रमाणे करणे गरजेचे असताना तलाठी व मंडळाधिकारी यांनी खरेदी घेणार यांच्याशी हातमिळवणी करून उर्वरित क्षेत्राचीही नोंद ही खरेदी घेणार यांच्या नावे बेकायदेशीरपणे केली.

उर्वरित मिळकत हडप करण्याच्या उद्देशाने दोघांनीही संगनमत करून मी खरेदी दिली नसताना उर्वरित मिळकत खरेदी घेणारच्या नावे बेकायदेशीर केली आहे. बिगर शेती केलेली ही मिळकत नगर-औरंगाबाद महामार्गालगत असल्याने तीचे बाजारभाव प्रचंड वाढलेले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून तलाठी व मंडळाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा,अशी मागणी पांडुरंग कर्डीले यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

1/Post a Comment/Comments

Post a Comment