नगर (तालुका प्रतिनिधी) - अनंत चतुर्दशीच्या अगोदरच्या रात्री गावातील गोरक्षकावर ७ ते ८ जणांनी धारदार हत्याराने वार करत खुनी हल्ला केल्याच्या निषेधार्थ जेऊर बायजाबाई (ता.नगर) गावातील सर्व गणेश मंडळांनी मंगळवारी (दि.१७) गणेश विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार टाकला. मात्र दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि.१८) सायंकाळी पोलिसांच्या मध्यस्थी नंतर गावातील सर्व मंडळांनी एकत्र मिरवणूक काढत उत्साहात गणेश विसर्जन केले. विशेष म्हणजे गावात प्रथमच एकत्रित गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.
एमआयडीसीचे स.पो.नि. माणिक चौधरी यांनी बुधवारी (दि.१८) दुपारी जेऊर गावात जावून सर्व गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या गुन्ह्यातील एका आरोपीला अटक केलेली असून, इतर आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर गणेश मंडळांनी बहिष्कार मागे घेतला. जेऊर गावात प्रथमच सर्व मंडळांनी एकत्रितरित्या मिरवणूक काढत गणेश विसर्जन केले. याप्रसंगी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गणेश विसर्जन करण्यावर बहिष्कार टाकण्याचीही जेऊर गावातील पहिलीच घटना आहे.
गोरक्षक दीपक शिंदे या तरुणाने सोमवारी (दि.१६) रात्री कत्तलीसाठी जनावरे घेवून जाणारा टेम्पो अडवला म्हणून ७ ते ८ जणांच्या टोळक्याने त्याच्यावर तलवार, कोयत्याने हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यात गोरक्षक शिंदे गंभीर जखमी असून त्याच्यावर नगरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याच्यावर ३ शस्रक्रिया कराव्या लागणार असल्याने उपचारासाठी मोठा खर्च येणार आहे. त्यामुळे गावातील गणेश मंडळे व तरुण वर्गाकडून त्याच्या साठी आर्थिक मदत जमा केली जात आहे.
गणेश मंडळांसह शिवाजीराव कर्डिलेंकडून आर्थिक मदत
जेऊर गावातील विविध १० मंडळांनी वेगवेगळे १० डी.जे. मिरवणुकीसाठी बोलावलेले होते. मात्र ते सर्व रद्द करत त्याचा खर्च टाळून जखमी गोरक्षक दीपक बाबासाहेब शिंदे (रा. जेऊर बायजाबाई, ता.नगर) यांच्या वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत दिली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी गुरुवारी (दि.१९) दुपारी रुग्णालयात जावून दीपक शिंदे याच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्याच्या उपचारासाठी आर्थिक मदत त्याच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केली. नगर बाजार समितीचे संचालक दत्ता तापकिरे, मधुकर मगर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक आघाडी अध्यक्ष रामेश्वर निमसे, माजी उपसरपंच बंडू पवार, उपसरपंच दिनेश बेलेकर, सुनिल पवार आदींनीही रुग्णालयात जावून जखमी दीपक शिंदे याची भेट घेतली.
अवैध कत्तलखान्यांमुळे परिसर बनतोय संवेदनशील
गोरक्षकावर झालेल्या खुनी हल्ल्यामुळे संपूर्ण गावात तीव्र संताप व्यक्त होत आहे. यापूर्वीही जेऊरगावात दोन गटांत दगडफेक, दंगल घडल्याच्या घटना घडल्या आहेत. ग्रामदैवत देवी बायजामाता यात्रोत्सवातदेखील दगडफेक होऊन अनेक भाविक जखमी झाल्याची घटना चालूवर्षीच घडली होती. दोन समाजात तेढ निर्माण होण्याचे प्रकार वाढले असून, जेऊर गाव संवेदनशील बनत आहे. याला कारणीभूत गावच्या परिसरातील अवैध कत्तलखाने असून या बाबीकडे पोलिसांनी गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
Post a Comment