नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर तालुक्यातील जेऊर येथे रयत शिक्षण संस्थेच्या श्री संतुकनाथ इंग्लिश विद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थ्यांचे दोन गट परस्परांना भिडून मोठी धुमश्चक्री शुक्रवार दि.७ रोजी झाली. घटनेत चॉपर, केबल, सत्तुर, दांडक्यांचा वापर तर तुफान दगडफेक करण्यात आल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते.
याबाबत समजलेली माहिती अशी की, संतुकनाथ विद्यालयात इयत्ता दहावीचा पेपर असल्याने विद्यालय लवकर सुटले होते. विद्यालय सुटल्यानंतर गावातील मुंजोबा चौकात ससेवाडी येथील एक गट तर मेहेत्रे वस्तीवरील एक गट परस्परांना भिडले व मोठी धुमश्चक्री झाली. तुंबळ हाणामारी सुरू असताना गावातील सुज्ञ नागरिक व एमआयडीसी पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने दोन्ही गटातील विद्यार्थ्यांनी पलायन केले. त्यामुळे घटनेत जखमी झालेल्यांची संख्या समजू शकली नाही. परंतु शाळेतील विद्यार्थ्यांकडे घातक चॉपर, सत्तुर, सु-यासारखी हत्यारे आढळून येत असल्याने पालक व शिक्षकांसाठी हा मोठा चिंतेचा विषय बनला आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून या गटांमध्ये धुसफूस सुरू असल्याची ही माहिती मिळत आहे. इयत्ता आठवी, नववी व दहावीतील विद्यार्थ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. सुरुवातीला दोन्ही गट विद्यालयाच्या मैदाना शेजारीच आमने-सामने आले होते. परंतु शिक्षकांनी मध्यस्थी केल्याने त्यावेळी वाद मिटला. परंतु पुढे मंजोबा चौकात आल्यानंतर दोन्ही गट पुन्हा एकमेकांना भिडले व तुफान हाणामारी झाली. यावेळी अल्पवयीन असलेल्या विद्यार्थ्यांकडे चॉपर, सत्तूर सारखी घातक हत्यारे असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सुमारे ५० ते ६० विद्यार्थ्यांचा घोळका आमने-सामने आला होता. दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यात आल्याने परिसरात तणावाचे वातावरण बनले होते.
दोन्ही गटातील वादाचे कारण समजू शकले नाही. परंतु सदर घटना मुलींच्या छेडछाडीवरून झाल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. शाळेतील अल्पवयीन विद्यार्थ्यांकडे घातक हत्यारे असणे हे धोकादायक आहे. पालक तसेच शिक्षकांचा विद्यार्थ्यांवर धाक राहिला नाही अशी परिस्थिती पाहावयास मिळत आहे. शिक्षकांनाही टवाळखोर मुलांकडून अरेरावी करण्यात येत असल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे शिक्षकही अशा बाबींकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षा केल्यास पालकही विद्यार्थ्यांची बाजू घेऊन शिक्षकांवर रोष व्यक्त करत असतात.
जेऊर येथील घडलेल्या घटनेवरून ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांकडेच घातक हत्यारे आढळून येत असतील तर पिढीचे भवितव्य धोक्यात आहे तसेच इतर विद्यार्थी व विद्यार्थिनी अशा टवाळखोर विद्यार्थ्यांच्या जाच तसेच दहशतीमुळे व्यवस्थित शिक्षण घेऊ शकत नाहीत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. घातक हत्यारे बाळगणा-या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी देखील ग्रामस्थ करत आहेत. घटनेनंतर स्कूल कमिटीच्या सदस्यांनी विद्यालयात जाऊन शिक्षकांशी चर्चा केली.
अल्पवयीन विद्यार्थ्यांकडे घातक हत्यारे असणे दुर्दैव आहे. अशा विद्यार्थ्यांच्या पालकांना समज देण्याची गरज आहे. टवाळखोर विद्यार्थ्यांचा इतर विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असतो. अशा विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.अशी भावना ग्रामस्थ व पालक वर्गांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांमध्ये हत्यारे बाळगण्याचे फॅड !
विद्यालयाच्या आवारात फिरणाऱ्या रोडरोमींओंवर देखील कारवाई करण्याची गरज आहे. शाळा परिसरांनी अनेक टारगट मुलांचे टोळके चकरा मारत असतात.धुम स्टाईल गाडी चालवणे, कट मारणे, पाठलाग करणे, अश्लील हावभाव करणे असले प्रकार घडत आहेत. तसेच अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये हत्यारे बाळगण्याचे फॅड शिक्षणासाठी घातक आहे.
विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादाची माहिती समजल्याबरोबर शिक्षकांना घटनास्थळी पाठविले होते. दहावीचा पेपर असल्यामुळे गडबड होती. परंतु ज्या विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला व ज्यांच्याकडे हत्यारे होती अशांची माहिती घेऊन त्यांच्या पालकांना बोलावून घेण्यात येणार आहे. पालकांनी आपल्या पाल्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. विद्यालयाच्या वतीने संपूर्ण प्रकाराची माहिती घेऊन संबंधित विद्यार्थी व पालकांना समज देण्यात येणार आहे. - सौ. रोहिणी भोर (प्रभारी प्राचार्या - संतुकनाथ विद्यालय)
बातमी पूर्णतः चुकीची आहे
ReplyDeletePost a Comment