अहिल्यानगर (प्रतिनिधी) -जिल्हा शासकीय रुग्णालयात औषध उपचाराकरिता दाखल असलेला रुग्ण रात्रीच्या वेळी रुग्णालयातून बाहेर पळून गेला. मात्र पळताना रोडवर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तो गंभीर जखमी झाला, त्यास उपचाराकरिता पुन्हा जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २१ एप्रिल रोजी पहाटे सुमारास घडली. बाबासाहेब मोहन बर्डे (वय ४३, रा.आडगाव, ता. पाथर्डी) असे मयताचे नाव आहे.
याबाबत जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलकर्णी यांच्या सांगण्यावरून तोफखाना पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार गोरडे यांनी फोनवरुन तोफखाना पोलिसांना कळविले की बाबासाहेब मोहन बर्डे यांनी १७ एप्रिल रोजी सायंकाळी विषारी औषध सेवन केल्याने अस्वस्थ झाल्याने त्यांची पत्नी छाया बाबासाहेब बर्डे यांनी त्यांना औषध उपचाराकरिता जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना रुग्णालयातील वार्ड क्रमांक १२ मध्ये दाखल केलेले होते. बाबासाहेब बर्डे यांच्यावर औषधोपचार सुरु असताना २१ एप्रिल रोजी पहाटे १.१५ वाजण्याच्या सुमारास ते वार्ड मधून बाहेर येत रुग्णालयातून बाहेर पळून गेले.
मात्र पळत असताना रोडवर पत्रकार चौक येथून जात असताना भरधाव वेगातील कोणत्यातरी अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले. त्यांना नागरिकांच्या मदतीने खासगी रुग्णवाहिका चालक गोविंद उर्फ किरण थोरात यांनी उपचारा करिता जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरानी त्यांना तपासून उपचारापूर्वीच मयत झाले असल्याचे घोषित केले.
याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलकर्णी यांनी दिलेल्या अहवालावरून आकस्मात मृत्यूची नोंद केलीआहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार मरभळ या करत आहेत.
Post a Comment