पहलगाम हल्ल्याचा सिनेइंडस्ट्रीतलाही धसका, यापुढं काश्मीरमध्ये शूटिंग होणार की नाही?


मुंबई - सहा वर्षांपूर्वी म्हणजे २०१९ मध्ये कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीर खोऱ्याचं चित्र बदलण्यास सुरुवात झाली. सिनेमे, टीव्ही मालिका आणि ओटीटी शोच्या चित्रीकरणासाठी अनेक टीम्स खोऱ्यात दाखल झाल्या होत्या. इतकंच नाही, तर तब्बल ३८ वर्षांनंतर 'ग्राउंड झीरो' या सिनेमाचा प्रीमिअरही नुकताच श्रीनगरच्या चित्रपटगृहात पार पडला होता. तेजस देऊस्कर दिग्दर्शित आणि इम्रान हाश्मी अभिनित 'ग्राउंड झीरो'चा श्रीनगरमधील एका थिएटरमध्ये प्रीमिअर होणं, हा ऐतिहासिक क्षण मानला गेला. मात्र आता पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये शूटिंगसाठी असलेल्या सकारात्मक वातावरणाला पुन्हा एकदा खीळ बसली आहे. पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर चित्रपटसृष्टीतील जाणकारांचं म्हणणं आहे की, काही काळासाठी तरी काश्मीरमध्ये चित्रीकरणासाठी जाणं थांबवावं लागेल; भारतीय सरकारच्या सूचना आणि निर्देशानुसार काही काळानं चित्रीकरणाबाबतचे निर्णय सिनेनिर्मिती संघटना घेतील.

जम्मू-काश्मीर हे बॉलिवूडपासून सगळ्याच सिनेनिर्मात्यांसाठी चित्रीकरणाकरिता नेहमीच स्वर्ग राहिले आहे. फक्त बॉलिवूडच नाही, तर दक्षिणेकडच्या दिग्दर्शकांनाही त्यांच्या सिनेमांमध्ये काश्मीरच्या निसर्गरम्य सौंदर्याचा मोह पडला. त्यांनाही तिथलं चित्रण त्यांच्या सिनेमात दाखवायचं होतं. ज्येष्ठ सिनेनिर्मात मुजफ्फर अली यांनीही 'जूनी' या अनेक वर्षांपासून रखडलेल्या सिनेमाचं चित्रीकरण नव्यानं काश्मीरमध्ये सुरू केलं होतं. पण आता काही काळ तरी सर्वच सिनेमांच्या चित्रीकरणाचं 'पॅकअप' झालंय.

चित्रीकरणासाठी लाडकं ठिकाण टीव्हीविश्वालाही काश्मीरचं आकर्षण कमी नव्हतं. हितेन तेजवानी आणि गौरी प्रधान या कलाकारांनी 'पश्मिना धागे मोहब्बत के' या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान काश्मीरचा अनुभव घेतला होता. तर ओटीटीवरील 'तनाव' सीरिजच्या कलाकारांनीही काश्मीरमध्ये चित्रीकरण करणं एक रोमांचक प्रवास असल्याचं सांगितलं. काही महिन्यांपूर्वी शर्मिष्ठा राऊत निर्मित 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेच्या काही भागांचं चित्रीकरण काश्मीरमध्ये करण्यात आलं होतं. मनोरंजनसृष्टीतील जाणकार म्हणतात, 'काश्मीर कायमच निर्मात्यांचं स्वप्नवत शूटिंग लोकेशन राहिलं आहे. मात्र दहशतीच्या सावटामुळे काही वर्षांपूर्वी तिथे फारसं चित्रीकरण केलं जात नव्हतं. मात्र अलीकडच्या वर्षांपूर्वी तिथे स्थिरता आल्यावर सरकारच्या पाठिंब्यामुळे पुन्हा एकदा सिने निर्मात्यांनी काश्मीरकडे मोर्चा वळवला होता.

0/Post a Comment/Comments