लुटमारीसाठी शिक्षकावर चाकु हल्ला करणारे दोघे ‘एलसीबी’ ने पकडले

अहिल्यानगर - रस्त्याने पायी चाललेल्या शिक्षकावर स्टेशन रोडवरील लोखंडी पुलावर लुटमारीच्या उद्देशाने अडवून त्यांच्यावर चाकु हल्ला करणारे २ आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहेत. प्रविण राजु चांदणे (वय१९) व राहुल राजू भोसले (वय २०, दोन्ही रा.सारडा कॉलेजमागे, सिध्दार्थनगर, अहिल्यानगर) अशी या आरोपींची नावे आहेत. 

याबाबतची माहिती अशी की, निखील विकास बोरकर (वय ३४,रा.पुसद, जि.यवतमाळ) हे कुटुंबियांना भेटण्यासाठी अहिल्यानगर येथे आले असताना ६ मे रोजी पहाटे ३.४५ च्या सुमारास श्वसनाचा त्रास झाल्याने ते घराबाहेर आले. बोरकर हे रेल्वे स्टेशन रोडने लोखंडी पुलावरून जात असताना अज्ञात तीन आरोपी मोपेडवरून येऊन त्यांनी फिर्यादीस आडवून खिसे तपासून पैस न मिळाल्याने फिर्यादीकडील मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असताना फिर्यादीने प्रतिकार केला.त्यावेळी आरोपीतांनी चाकुने त्यांचे हातावर, पाठीवर वार करून पळून गेले.याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात जबरी चोरीच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.

या गुन्ह्याचा समांतर तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिनेश आहेर यांनी पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, शाहीद शेख, विजय ठोंबरे, रोहित येमुल, रोहित मिसाळ, मयुर गायकवाड, सुनिल मालणकर, प्रशांत राठोड यांचे  पथक नेमले होते. सदर पथक ९ मे रोजी गोपनीय माहिती व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे गुन्हयाचा तपास करत असताना सदरचा गुन्हा प्रविण चांदणे याने त्याचे दोन साथीदारासह केला असून ते सध्या सिध्दार्थनगर येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सिध्दार्थनगर येथे जाऊन संशयीतांचा शोध घेऊन ते मोपेड गाडीवर असताना प्रविण राजु चांदणे व राहुल राजू भोसले यांना ताब्यात घेतले. तर त्यांचा साथीदार गणेश विजय लोमटे (रा.प्रेमदान हाडको, अहिल्यानगर) हा फरार झाला. या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली टीव्हीएस कंपनीची विना क्रमांकाची मोपेड जप्त करण्यात आली. आरोपींना पुढील तपासासाठी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments