अहिल्यानगर - ओरिसा राज्यातून नगरमध्ये विक्रीसाठी आणलेला गांजाचा मोठा साठा कोतवाली पोलिसांनी केडगाव बायपास परिसरात सिनेस्टाईल कारवाई करत पकडला आहे. हा गांजा विक्री साठी आलेले तिघे आणि तो खरेदीसाठी २ कारमधून आलेले ७ अशा १० जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या कडून २० लाखांच्या गांजासह, ३ वाहने, ११ मोबाईल असा ८८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी १९ जून रोजी रात्री १०.४० च्या सुमारास सुरु केलेली ही कारवाई २० जून रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत चालली.
कोतवालीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांना गोपनीय माहिती मिळाली की ओरिसा राज्यातून छत्रपती संभाजी नगर मार्गे नगर शहरात विक्री साठी गांजाचा मोठा साठा एका मालट्रक मध्ये आणला जात आहे. या गांजाची विक्री केडगाव बायपास परिसरात केली जाणार आहे. ही माहिती मिळताच त्यांनी शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांना माहिती देवून मोठा फौजफाटा बरोबर घेत केडगाव बायपास गाठले. तेथे टोलनाक्यापासुन जवळ असलेल्या भारत बेंज वाहन शोरुम जवळ पोलीसांना वेगवेगळ्या पथकांत विभागून अंधाराचा फायदा घेवून दबा धरुन बसण्यास सांगितले. रात्री १०.४० चे सुमारास एक मालट्रक (क्र. एमएच १६ सी जी ०४५२) संशयास्पदरित्या टोलनाका पास करुन पुढे येताना दिसला. त्यातच गांजा असणार याबाबत संशय बळावल्याने पोलीस पथकाने मालट्रक थांबवून ट्रकचालकास विचारपुस केली. त्यावेळी तो आणि त्याच्या समवेत असलेले अन्य दोघेजण गडबडले.
पोलिसांनी ट्रकची पाहणी केली असता त्यात लोखंडी पोल, अँगल होते. परंतु ट्रकचे केबिनच्या वरच्या बाजूला ४ गोण्या बारदान्या खाली झाकलेल्या दिसल्या. त्यांची पाहणी केली असता त्यात खाकी रंगाचे चिकट टेप मध्ये विटांच्या आकाराचे पॅकबंद पॅकेट दिसून आले. त्या बाबत विचारणा केल्यावर ट्रक चालक संतोष प्रकाश दानवे (रा. वाळवणे, ता. पारनेर) याने त्यात गांजा असल्याचे सांगून तो बहिरमपुर, ओरिसा राज्यातून आणलेला असल्याचे सांगून तो गांजा घेण्यासाठी काही लोक टोलनाक्यापासून जवळच असलेल्या मोकळ्या मैदानात येणार आहेत. असे सांगितले.
पोलिसांनी या ट्रकचा पंचनामा सुरु केला असता चालकाच्या मोबाईलवर एका इसमाचा फोन आला व त्याने तुम्हाला केडगाव बायपास वर येण्यास किती वेळ लागेल असे विचारले. त्यावेळी पो.नि. दराडे यांनी शक्कल लढवत चालकाला त्याच्याशी व्यवस्थित बोलण्यास सांगून बोलावून घेतले. एका बाजुला वाहनाचे आडोशाला मुद्देमाल जप्ती पंचनामा चालु असताना अतिरिक्त पोलीस अंमलदार यांना सदर ठिकाणाचे आजुबाजूला काही अंतरावर अंधारात दबा धरुन बसण्यास सांगितले.
सदर ठिकाणी काही वेळात एक लाल रंगाची स्वीफ्ट कार (क्र. एम. एस. १६. सीव्ही २७८६) व काळ्या रंगाची होंडा सिटी कार (क्र. एम.एच. १२ सी.डी. ३१२७) अशी दोन वाहने आली. सदर वाहनातील इसम मालट्रकची नंबरवरुन खात्री करित असताना त्यांना काही कळण्याचे आत अंधारात दबा धरून बसलेल्या साधे वेषातील पोलीसांनी दोन्ही चारचाकी वाहने व त्यात बसलेल्या इसमांना ताब्यात घेतले.
यामध्ये मालट्रक संतोष प्रकाश दानवे (वय ४०,रा. वाळवणे, ता. पारनेर), गणेश बापू भोसले (वय २५, रा. जवखेडे खालसा, ता. पाथर्डी), प्रशांत सुरेश मिरपगार (वय २५, रा. कामत शिगये, ता. पाथर्डी), प्रदिप बापू डहाणे (वय २९, रा. पिंपळगाव लांडगा, ता. नगर), भगवान संजय डहाणे (वय २१, रा. पिंपळगाव लांडगा, ता. नगर), संदिप केशव बाग (वय २९, रा. ओरिसा), दिलीप माखनो भेसरी (वय ३०,रा. घुडाधार, जि.बेनिका, राज्य ओरिसा), अक्षय बापू डहाणे (वय २५, रा. पिंपळगाव लांडगा, ता. नगर), प्रमोद सुहास क्षेत्रे (वय २९, रा. आलमगीर, भिंगार), ईश्वर संतोष गायकवाड (वय २६, रा. पिंपळगाव लांडगा, ता. नगर) यांचा समावेश आहे. त्याच्या ताब्यातून १९ लाख ९० हजार रुपये किंमतीचा गांजा मालट्रक, २ कार व ११ मोबाईल असा एकूण ८८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या १० जणांसह ओरिसा राज्यातील १ गांजा तस्कर अशा ११ जणांच्या विरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, स.पो.नि. कुणाल सपकाळे, उपनिरीक्षक शितल मुगडे, पोलिस अंमलदार बोडखे, रोहिणी दरंदले, राजेंद्र औटी, सचिन मिरपगार, गणेश चक्षाण, राहुल शिंदे, संदिप पितळे, दिपक रोहोकले, तानाजी पवार, दक्षिण विभाग मोबाईल सेलचे राहुल गुंडु, सुरज कदम, सचिन लोळगे, शिरीष तरटे, अतुल कोतकर, राम हंडाळ, संकेत धिवर, सोमनाथ राऊत, बाळासाहेब ढाकणे, अर्जुन फुंदे, प्रतिभा नागरे यांनी केली आहे.
Post a Comment