श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरमधील लिडवास येथे लष्कराने सोमवारी (दि.२८) ३ पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार मारले. ही माहिती भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने दिली. लष्कराने सांगितले की ही कारवाई ऑपरेशन महादेव अंतर्गत करण्यात आली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पहलगाम हल्ल्याचा मुख्य आरोपी हाशिम मुसा देखील ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये आहे. तथापी, लष्कराने अधिकृतपणे याची पुष्टी केलेली नाही.
दहशतवाद्यांकडून अमेरिकन बनावटीचे एम ४ कार्बाइन, एके-४७, १७ रायफल ग्रेनेड सापडले आहेत. याशिवाय, इतर अनेक संशयास्पद वस्तू देखील जप्त करण्यात आल्या आहेत. दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले.
भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुप्तचर माहितीनंतर सकाळी शोध मोहीम राबवण्यात आली. या दरम्यान, दुरून दोनदा गोळीबाराचा आवाज ऐकू आला. परिसरात सुरक्षा दलांची तैनाती वाढवण्यात आली आहे.
हल्ल्यानंतर केलेल्या तपासात तीन दहशतवाद्यांची नावे उघड झाली. २४ एप्रिल रोजी अनंतनाग पोलिसांनी ३ रेखाचित्रे प्रसिद्ध केली. तिन्ही दहशतवाद्यांची नावे अनंतनागचा आदिल हुसेन ठोकर, हाशिम मुसा उर्फ सुलेमान आणि अली उर्फ तल्हा भाई अशी आहेत. मुसा आणि अली हे पाकिस्तानी आहेत. मुसा हा पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपमध्ये कमांडो होता. त्यांच्यावर प्रत्येकी २० लाख रुपयांचे बक्षीसही ठेवण्यात आले आहे.
एनआयएने अटक केलेल्या दोन आरोपींनी या तीन दहशतवाद्यांची नावे उघड केली आहेत की इतर काही दहशतवाद्यांची हे सध्या स्पष्ट झालेले नाही.
Post a Comment