मुंबई - सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारने लिलावात जिंकली असून महाराष्ट्रात आणण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. लंडनहून ही शौर्याची निशाणी आता आपल्या मातीत परत येणार असून, हा महाराष्ट्राचा विजय असल्याची प्रतिक्रिया शेलार यांनी दिली आहे.
आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील थोर सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारने लिलावातून जिंकली होती, लंडनहून ही शौर्याची निशाणी आता आपल्या मातीत परत येणार असून, हा महाराष्ट्राचा विजय आहे. ही तलवार म्हणजे मराठ्यांच्या शौर्याची, मुत्सद्देगिरीचे आणि वैभवाची अमूल्य निशाणी असून, अशा लिलावात पहिल्यांदाच आपण ऐतिहासिक वारसा जिंकून आणलेला आहे.
पुढे ते म्हणाले, या ऐतिहासिक तलवारीचा लिलाव जिंकण्यापासून ते ती ताब्यात घेण्यापर्यंतच्या सर्व प्रक्रियेमध्ये महत्त्वाचे मार्गदर्शन आणि भूमिका असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारताचे परराष्ट्र मंत्रालय, लंडन येथील भारतीय दूतावासाचे अधिकारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सर्व अधिकारी यांचे मनःपूर्वक आभार!
तलवार राज्य सरकारच्या ताब्यात आल्याचा विशेष आनंद- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आपल्या मराठा साम्राज्यातील एक मौलिक आणि ऐतिहासिक ठेव असलेली, नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार ही लिलावात निघाली होती. ती राज्य सरकारने 29 एप्रिल रोजी खरेदी केल्यानंतर, आज त्याचा प्रत्यक्ष ताबा राज्य सरकारकडे आला आहे.
माझे सहकारी आणि राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी लंडनमध्ये हा ताबा स्वीकारला. काही तांत्रिक कारणांमुळे ती मध्यस्थामार्फत खरेदी करावी लागली होती. पण, आता ती त्या मध्यस्थामार्फत सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करीत त्यांनी ताब्यात घेतली आहे.
आता ही तलवार लवकरच महाराष्ट्रात येईल आणि त्याचा कायमस्वरुपी ताबा हा राज्य सरकारकडे असेल. छत्रपती शाहू महाराजांनी ‘सेनासाहिबसुभा’ ही उपाधी राजे रघुजी भोसले यांना दिली होती. राजे रघुजी भोसले यांनी अनेक युद्धमोहीमांचे नेतृत्त्व करीत मराठा साम्राज्याचा बंगाल, ओडिशापर्यंत विस्तार केला होता. दक्षिण भारतात सुद्धा त्यांनी आपला लष्करी आणि राजकीय दबदबा निर्माण केला होता.
ही तलवार मराठा शैलीच्या फिरंग पद्धतीच्या तलवारीचा उत्कृष्ट नमुना आहे. एकधारी पाते, सोन्याचे नक्षीकाम हे या तलवारीचे वैशिष्ट्य आहे. युरोपिय बनावटीचे पाते हे त्या काळात प्रसिद्ध होते. या पात्याच्या पाठीवर तळाशी ‘श्रीमंत रघोजी भोसले सेनासाहिबसुभा’ असे सोन्याच्या पाण्याने लिहिले आहे. 1817 मध्ये नागपुरात ईस्ट इंडिया कंपनीने भोसल्यांच्या खजिन्याची लूट केली होती. त्यात ही तलवार नेली असावी, असा जाणकरांचा अंदाज आहे. आता ही तलवार अधिकृतपणे राज्य सरकारच्या ताब्यात आल्याचा आम्हाला विशेष आनंद आहे. यासाठी परिश्रम करणाऱ्या मंत्री आशिष शेलार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
तलवार ब्रिटीशांनी लुटली की अधिकाऱ्यांनी चोरली?
संबंधित तलवार कंपनीपर्यंत कशी पोहोचली हे मोठे कोडेच आहे. 1853 ते 1864 या कालावधीत महाराज श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोंसले (दुसरे) उर्फ (आप्पासाहेब महाराज) यांच्या नेतृत्वात मराठा विरुद्ध ब्रिटिश युध्द झाले होते. त्याच कालावधीत इंग्रजांनी ब्रिटीशांनी नागपूरकर भोसल्यांचा खजिना लुटला होता. त्यात अनेक रत्नजडित दागदागिने, शस्त्रसाठा व तलवारींची लूट करण्यात आली होती. त्या लुटीत कदाचित ही तलवार गेली असावी अशी शक्यता आहे. याशिवाय एखाद्या ब्रिटिश अधिकाऱ्याने ही तलवार लपून नेली असावी व कालांतराने तिची विक्री केली असावी अथवा कुणाला तरी भेट दिली असावी असा अंदाज आहे. पण हे ऐतिहासिक शस्त्र लिलाव करणाऱ्या कंपनीकडे कशी आली? हा मोठा प्रश्न आहे.
तलवारीला सोन्याने जडवलेली मूठ
संबंधित तलवार ही युरोपियन शैलीतील आहे. त्यावर देवनागरी लिपीने अंकित करण्यात आले आहे. एवढेच नाही तर तिला सोन्याने जडवलेली मूठही आहे. तसेच हिरव्या विणलेल्या लोकरीची पकडही तलवारीला आहे. या तलवारीत एकेरी ब्लेड आहे. ही तलवार 124 सेमी लांब आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे नागपूरच्या भोसले घराण्याच्या या तलवारीला इतिहासात विशेष महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे या तलवारीच्या लिलावाला आंतरराष्ट्रीय पातळीवरही विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागपूरमधील संस्कृती व इतिहासावर आधारित ही तलवार एक अद्वितीय वारसाही मानली जाते. त्यामु्ळे ही तलवार न्यूयॉर्कमध्ये कशी पोहोचली? याची पडताळणी करण्याची गरज आहे. विशेषतः भारतीय इतिहासातील या महत्त्वपूर्व ठेव्याचे भारताकडे पुनर्वसन होण्याची गरज असल्याचे मतही इतिहासप्रेमींनी व्यक्त केले आहे.
Post a Comment