अहिल्यानगर - वाळू, खडी आणि मुरुमाच्या वाहतुकीसाठी दरमहा २० हजार रुपयांची लाच (हप्ता) मागणाऱ्या राहाता पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल अनिल रामनाथ गवांदे (वय ३५) याला नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १५ हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. २५ सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबतची माहिती अशी की, तक्रारदार यांचा खडी, मुरुम आणि वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांच्या खडी भरलेल्या ढंपरवर १८ सप्टेंबर २०२५ रोजी राहाता पोलिसांनी कारवाई करत तो जप्त केला होता. त्यानंतर २१ सप्टेंबर रोजी पोलीस कॉन्स्टेबल गवांदे यांनी तक्रारदारांना फोन करून भेटायला बोलावले.
राहाता पोलीस ठाण्याच्या हद्दीत व्यवसाय सुरळीत चालू ठेवायचा असेल आणि ढंपर वरील कारवाई टाळायची असेल, तर दरमहा २० हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, अशी मागणी कॉन्स्टेबल गवांदे यांनी तक्रारदाराकडे केली. त्यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने २४ सप्टेंबर रोजी अहिल्यानगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दाखल केली. या तक्रारीची पडताळणी केली असता, पोलीस कॉन्स्टेबल गवांदे यांनी २० हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती १५ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे स्पष्ट झाले.
त्यानुसार, २५ सप्टेंबर रोजी लाच लुचपतच्या पथकाने राहाता पोलीस स्टेशन परिसरात सापळा रचला. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल अनिल गवांदे याने तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच लाच लुचपतच्या पथकाने त्याला तातडीने रंगेहाथ पकडले.
पोलीस कॉन्स्टेबल गवांदे याच्या विरोधात राहाता पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'लाच लुचपत' चे पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
Post a Comment