अहिल्यानगर - ३ वर्षांपूर्वी अपहरण झालेल्या कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथील अल्पवयीन मुलीचा पोलिस अधिक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने शोध लावत तिला अपहरण करणाऱ्या आरोपीसह ताब्यात घेतले आहे.
कोळगाव थडी येथील अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने २० मे २०२२ रोजी फुस लावून पळवून नेले होते. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, दीर्घकाळ तपास लागला नसल्याने हा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, अहिल्यानगर येथे वर्ग करण्यात आला. या वेळी गुन्ह्यात भा.दं.वि. ३७० हे वाढीव कलम लावण्यात आले होते. तपासाची जबाबदारी पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्याकडे देण्यात आली होती.
त्यानंतर निरीक्षक इंगळे व त्याच्या पथकातील अंमलदारांनी वेगवेगळ्या गुप्त मार्गाने, तसेच बातमीदारांच्या मदतीने सखोल तपास सुरू ठेवला. अखेर सातत्यपूर्ण शोधानंतर सदर अपहृत मुलगी आरोपी गोकुळ गोरख गोधडे (वय २१, रा. कोळगाव थडी) याच्या सोबत दीड वर्षाचा मुलगा व ६ महिन्यांची मुलगी यांच्यासह मिळून आली. सर्वांना ताब्यात घेवून पुढील तपासासाठी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस उपअधीक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक इंगळे यांच्यासह अंमलदार समीर सय्यद, अर्चना काळे, अनिता पवार, छाया रांधवन, एस. एस. काळे यांच्या पथकाने केली.
Post a Comment