अहिल्यानगर - कापुरवाडी (ता. नगर) परिसरात वृध्द महिलेचे तोंड दाबुन दागिने लुटणार्या नेवासा तालुक्यातील दोघा सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले आहे. विठ्ठल ज्ञानेश्वर तुपे (वय २४,रा. जेऊर हैबती, कुकाणा, ता. नेवासा) व सुदाम विक्रम जाधव (वय २९,रा. सुलतानपुर, ता. नेवासा) अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी फिरोज अजिज शेख (रा. नेवासा फाटा, ता. नेवासा) याच्यासह गुन्हा केल्याची कबूली दिली आहे. फिरोज शेख पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
८ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास सरस्वती शिवाजी दुसुंगे (रा. दुसुंगेमळा, पिंपळगाव उज्जैनी रस्ता, कापुरवाडी) या मळगंगा देवीच्या मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. या दरम्यान तीन अनोळखी इसमांनी त्यांचे तोंड दाबून आणि डोक्यावर पिस्तुल लावून त्यांचे गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख ३५ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. सदर घटनेबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक मेढे व राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार विष्णु भागवत, भगवान थोरात, सुनील मालणकर, भगवान धुळे, अर्जुन बडे यांचे पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. त्यांनी घटनास्थळी भेट देऊन संशयित आरोपींची माहिती संकलित केली.
तपासादरम्यान माहिती मिळाल्याप्रमाणे संशयित आरोपी विठ्ठल तुपे, सुदाम जाधव व त्यांचा साथीदार फिरोज शेख या गुन्ह्यात सामील असल्याचे उघड झाले. पोलिसांनी कुकाणा येथून विठ्ठल तुपे आणि सुदाम जाधव यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि दुचाकी असा एकूण २ लाख ५ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
विठ्ठल ज्ञानेश्वर तुपे याच्याविरूध्द पूर्वी नेवासा पोलीस ठाणे व तोफखाना पोलीस ठाणे येथे दरोडा व जबरी चोरीचे २ गुन्हे दाखल आहेत. तसेच सुदाम विक्रम जाधव याच्याविरूध्द पाथर्डी पोलीस ठाणे येथे चोरीचा १ गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Post a Comment