ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर अहिल्यानगरमध्ये हल्ला



नगर - ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केला आहे. नगर-दौंड महामार्गावरील खंडाळा शिवारात हॉटेल सारंगीजवळ २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास हा हल्ला झाला. या हल्ल्यात गाड्यांची काच फुटली असून एका कार्यकर्त्याला दुखापत झाली आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण हाके पाथर्डी तालुक्यातील दैत्य नांदूर येथे नियोजित कार्यक्रमासाठी जात होते. यावेळी नगर-दौंड महामार्गावर अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. यामुळे एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

हा हल्ला कोणी केला हे मला माहिती नाही. पण आमच्या दोन गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. गाडीत असलेला एक कार्यकर्ता जखमी झाला आहे. याआधी माझ्यावर सात-आठ वेळा हल्ले झालेले आहेत. मी पोलिसांना देखील आधीच सांगितले होते. पण आता मी काही बोलणार नाही. सरकारला आम्ही वारंवार सांगितले, आता बोलून काही उपयोग नाही’, अशी उद्विग्न प्रतिक्रिया हाके यांनी दिली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलीस ठाण्याचे स.पो.नि. प्रल्हाद गिते यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेत काहींना ताब्यात घेतले आहे.

याबाबत बलभीम भागवत बारगजे (रा. गेवराई, बीड) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात ७ ते ८ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


0/Post a Comment/Comments