बळीराजा पावसाने त्रस्त, कलेक्टर नाचगाण्यात व्यस्त: व्हायरल व्हिडीओमुळे संतापाची लाट



धाराशिव - मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. धाराशिव, बीड, सोलापूर या भागांत पुराच्या पाण्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील पिके वाहून गेली आहेत. जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. अनेक घरे पाण्याखाली गेल्याने संसार उद्ध्वस्त झाले आहेत. एकीकडे शेतकऱ्यांचा आक्रोश, आंकात सुरू असताना जिल्ह्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर असते ते जिल्हाधिकारी मात्र नाचगाण्यात दंग झालेत.

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्या या व्हिडिओमुळे प्रचंड संताप व्यक्त होतोय. जिल्ह्यातला बळीराजा उपाशी आणि प्रशासन तुपाशी अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. धाराशिवच्या जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांचा नवरात्र महोत्सवातील डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुळजापुरात नवरात्र उत्सवानिमित्त मंदिर संस्थानकडून सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात दोन्ही वरिष्ठ अधिकारी मंचावर नाचताना दिसत आहेत. पावसाने हवालदिल झालेल्या जनतेला मदत करण्याऐवजी अधिकारी नवरात्र सोहळ्यात रंगलेले दिसल्याने पूरग्रस्तांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ते मदत कधी मिळणार, असा सवाल करत आहेत.

मदतकार्य अपुरेच्या तक्रारी

जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या या व्हिडिओनंतर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पुरात शेतकरी उध्वस्त झाला. गावोगाव जनावरे वाहून जात आहेत. लोक घरदार गमावून रस्त्यावर आले आहेत. अशा गंभीर परिस्थितीत प्रशासनाने लोकांसोबत राहून मदतकार्य करायला हवे होते. मात्र, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारीच नाचगाण्यात वेळ घालवत असल्याचे पाहून जनतेचा विश्वासच ढळला आहे, असे म्हणत नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. विशेष म्हणजे, धाराशिव जिल्ह्यातील अनेक भागात अजूनही बचाव आणि मदतकार्य अपुरे असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

प्रशासनाची बेफिकिरी खुपणारी

पूरस्थितीत प्रशासनाकडून संवेदनशीलता अपेक्षित असते. मात्र, अशा परिस्थितीत वरिष्ठ अधिकारीच सांस्कृतिक कार्यक्रमात नाचताना दिसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबद्दल शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. शेतकरी आणि पूरग्रस्तांना तातडीने मदत पोहोचवून त्यांचे संसार उभे करण्याची गरज असताना प्रशासनाची ही बेफिकिरी नागरिकांच्या डोळ्यात खुपणारी आहे. त्यामुळे आता शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

0/Post a Comment/Comments